मिठबाव फिशिंग सोसायटीच्या वतीने मच्छिमारांनी शासनाच्या योजनांचे लाभ घेण्याचे सूतोवाच

*⚡देवगड ता.१९-:* मच्छिमार बांधवांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा ! त्यासाठी आम्ही अधिकारी वर्ग सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. फक्त आपण आपल्या समस्या मोकळेपणाने मांडाव्यात असे मत्स्यव्यवसाय अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी देवगड तालुक्यातील तांबळडेग येथे मिठबाव फिशिंग अँड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मच्छिमार बांधवाना मार्गदर्शन करताना मालवणकर बोलत होते. प्रारंभी सागर सुरक्षारक्षक धाकोजी खवळे यांनी मत्स्यव्यवसाय अधिकारी, बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक यांनी एकत्रितरित्या शासनाच्या योजना कशा आहेत, त्याचा फायदा कसा करून घेता येईल हे आपण पहिले पाहिजे हेच सांगण्याकरिता आजच्या शिबिराचे आयोजन असल्याचे प्रास्ताविक करताना सांगितले. तर बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक नितीन आढाव यांनी मच्छिमार बांधवाना बँक कर्ज आणि ‘किसान क्रेडिट कार्ड’ याविषयी माहिती करून दिली. याचा लाभ मोठ्या प्रमाणात मच्छिमारांनी घ्यावा असे सूचित केले. याप्रसंगी कुशल मच्छिमार पंढरीनाथ सनये यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन धर्माजी आडकर, माजी सरपंच अनिता अरविंद कुबल, प्रदीपकुमार कोयंडे, शंकर भाबल, सागर सनये, सत्यवान सरवणकर आदी प्रभृतींसह मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव उपस्थित होते. सोसायटीचे सचिव सीताराम तथा काका मुणगेकर यांनी मौलिक शब्दात सूत्रसंचालन केले.

You cannot copy content of this page