खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण दि प्रतिनिधी व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज मधून बाहेर पडणारे वकील हे समाजासाठी व देशासाठी चांगले काम करतील असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चांगले वकील समाजकारणात व राजकारणातही येणे गरजेचे आहे, येथील मुलांनी समाज परिवर्तनाच्या दृष्टीने जिल्ह्यात चांगले काम करावे असे आवाहन खास. सुळे यानी यावेळी केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि कुडाळ येथील व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान व पारितोषिक वितरण समारंभ सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी खास. सुळे या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, लॉ कॉलेजच्या प्राचार्या शिल्पा मर्गज, पुणे जिल्हा बँकेच्या व्हाईस चेअरमन अर्चना घारे- परब, राष्ट्रवादीचे अबीद नाईक, ऍड. संदेश तायशेटे, डॉ. विवेक रेडकर, प्रा. समृद्धी म्हाडगुत डॉ विश्वास साठे आदी उपस्थित होते. यावेळी खास. सुळे यांचा लॉ कॉलेज तर्फे व्हिक्टर डॉन्टस यांच्या हस्ते तर सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे प्राचार्या डॉ. सामंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेजच्या पदवीधर विद्यार्थ्यांना खास. सुळे व मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना खासदार सुळे यांनी संसदपटू बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते यांच्या संसदेतील कार्याची आठवण काढताना संसदेच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेली मधू दंडवते, नाथ पै यांची भाषणे ऐकून आम्ही अभ्यास करतो. नाथ पै व दंडवते ही थोर माणसे कोकणच्या मातीत होऊन देशाला मोठे योगदान दिले. सीडी देशमुख हे देखील थोर व्यक्तिमत्व देशाला दिले. आणि हल्लीच्या काळात सुरेश प्रभू हे मोठे अभ्यासू नेते कोकणाने दिल्याचे खास. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. खास. सुळे पुढे म्हणाल्या, अनेक आमदार खासदार हे वकील असतात , व्हिक्टर डान्टस यांनी चतुराईने लॉ कॉलेज काढले आहे. संसदेमध्ये सदस्यांमध्ये टोकाचे मतभेद होतात. कालांतराने ते दूर होतात. मात्र वकिलांमध्ये तसे होत नाही, कारण ते कोणत्या बाजूचे असतात हे कधी कळत नाही. कधी कोणाची बाजू घेतील, कधी कोणाच्या विरोधात लढतील हे सांगता येत नाही. वकील हे स्पेशल असतात, वकिली हा खूप मस्त पेशा आहे, तिथे वैयक्तिक मतभेद नसतात, ते फक्त आपल्या अशिलासाठी लढत असतात. टोकाचे मतभेद असले तरी वैयक्तिक मैत्री तुटत नाही, वैयक्तिक विरोध नसतो, फक्त कामपूरती कटुता असते. संसदेतील सदस्यांनी हे वकिलांकडून शिकले पाहिजे, असेही खास. सुळे म्हणाल्या. व्हिक्टर डॉन्टस यांनी कॉलेज, जिल्हा बँक यांच्या माध्यमातून खूप चांगले काम सुरू ठेवले असून ते अभिमानस्पद आहे. डॉन्टस यांच्यातील कृतज्ञतेचा गुण मला आवडतो. त्यांच्या वागण्या बोलण्यातून कृतज्ञतेचा भाव जाणवतो, असे सांगत खास. सुप्रिया सुळे यांनी डॉन्टस यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी प्राचार्या उज्वला सामंत, प्राचार्या शिल्पा मर्गज, ऍड. संदेश तायशेटे यांची समयोचित भाषणे झाली. शेवटी आभार व्हिक्टर डान्टस यांनी मानले.
