अवकाळी पावसाने मालवणला झोडपले…

पर्यटकांसह सर्वांचीच तारांबळ…

मालवण दि प्रतिनिधी अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात अशा दोन ठिकाणी एकाच वेळी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या पार्श्वभूमीवर आज मालवणात दुपारी पावणे तीन वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावत रात्री उशिरापर्यंत आपला जोर कायम ठेवत मालवणला झोडपून काढले. या पावसामुळे मालवणात आलेल्या पर्यटकांसह सर्वांचीच तारांबळ उडाली तर ठिकठिकाणी तुलसी विवाह सोहळ्याच्या उत्साहावर देखील विरजण पडले. येत्या दोन दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम पश्चिम किनारपट्टीवर देखील जाणवत आहे. अशातच पश्चिम किनारपट्टीवरही अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे गेले काही दिवस अधून मधून पावसाच्या सरी बरसत असून काल सायंकाळी पावसाने मालवणला झोडपून काढले. या पार्श्वभूमीवर आजही पावसाने जोरदार हजेरी लावत मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे मालवणातील जनजीवन विस्कळीत झाले. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने रात्री उशिरा पर्यंत आपला जोर कायम ठेवला होता. यामुळे सायंकाळच्या वेळेत तुलसी विवाह सोहळ्याच्या उत्साहावर विरजण पडले. तर सध्या मालवणात पर्यटक दाखल झाले असून अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांचीही धांदल उडाली. तर किल्ला होडी वाहतूक, वॉटरस्पोर्ट्स आदी पर्यटन व्यवसायही बंद ठेवावे लागले आहेत. पावसामुळे बंदर जेटी परिसरातील स्टॉल धारकांची देखील तारांबळ उडाली. दरम्यान १७ व १८ नोव्हेंबर अशा येत्या दोन दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच किनारपट्टी भागात ४०- ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. तर समुद्र खवळलेला राहणार आहे, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जोरदार वारे व मुसळधार पाऊस, व खवळलेला समुद्र यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page