सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पुढाकार..
⚡कुडाळ ता.२७-: बदललेले अन्नसुरक्षा नियम आणि खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी एका विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता ‘मराठा समाज हॉल’ येथे हे शिबीर होणार आहे.
या शिबिराला जिल्ह्याचे अन्नसुरक्षा प्रशासनाचे उपायुक्त श्री. गायकवाड साहेब, अन्नसुरक्षा निरीक्षक अभय चंदनशिवे आणि व्यापारी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून व्यापाऱ्यांना थेट मार्गदर्शन करणार आहेत.
अन्नसुरक्षा कायद्यातील नवीन बदल आणि नियमांची योग्य माहिती नसल्यास व्यापाऱ्यांना कायदेशीर अडचणी किंवा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. हे शिबीर पूर्णपणे मोफत असून, यामध्ये प्रत्यक्ष माहितीसह ‘प्रश्न-उत्तर’ सत्रही होणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांना आपल्या शंकांचे निरसन थेट अधिकाऱ्यांकडून करून घेता येईल.
जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी या शिबिराला उपस्थित राहणे आवश्यक आहे. हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालक, बेकरी, केक शॉप आणि मिठाई विक्रेते, किराणा व्यापारी आणि चायनीज सेंटर
कोकणी मेवा, वडापाव सेंटर व इतर सर्व खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासाठी हे शिबीर उपयुक्त आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व संबंधित व्यापाऱ्यांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सर्व पदाधिकारी, हॉटेल संघटना, तालुकाध्यक्ष आणि सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
