वेंगुर्ला
महाराष्ट्रामध्ये गोवंश जनावरांच्या कत्तलीस बंदी असतानाही गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असणाऱ्या सावंतवाडी येथील सराईत संशयिताला अखेर अटक करण्यात आली आहे. सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (रा. बाहेरचा वाडा,ता. सावंतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान त्याला शनिवारी वेंगुर्ला पोलिसांनी वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता संबंधितास न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ला पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी संयुक्तपणे सापळा रचून ही कारवाई केली होती. दोन्ही ठाण्याच्या पोलीस पथकाचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. संबंधित संशयित धाकोरे येथे २५ किलो गोमांस टाकून फरार झाला होता. अवैध गुरे वाहतूक प्रकरणी दोन्ही पोलीस स्थानके जोरदार कारवाई करीत असून या कामगिरीबाबत विशेष कौतुक होत आहे. वेंगुर्ला पोलिसांनी नुकतीच दोन दुचाकी चोरी प्रकरणी एकास गजाआड केले होते व एक दुचाकी हस्तगत केली होती. त्यानंतर गोमांस प्रकरणी वेंगुर्ला पोलीस जिल्हा व जिल्ह्याबाहेरही तपासकामात सक्रिय होते.याप्रकरणी पोलीस हवालदार प्रसाद कदम हे अधिक तपास करीत आहेत.
गोमांस वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील संशयितास न्यायालयीन कोठडी
