कणकवली : “पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावताना अनेकदा रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय घनश्याम आढाव यांनी जवळून अनुभवली. त्या जाणिवेतून सेवानिवृत्तीपूर्वी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव कृतीतून दाखवून दिली आहे. हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे,” असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी काढले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कणकवली आणि सिंधुरत्न रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी बोलताना घनश्याम आढाव म्हणाले, “रक्ताचा तुटवडा असल्याचे समजताच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येक सक्षम व्यक्तीने रक्तदानाचा संकल्प करावा.” यावेळी त्यांनी स्वतःही रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला.
कार्यक्रमाला डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. सर्वेश तायशेटे, डॉ. समीरा रावराणे, सिंधुरत्न रक्तमित्र प्रतिष्ठानचे मकरंद सावंत, सुशील परब, विनू महाडिक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, वैभववाडीचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, आचराचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, विजयदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर तसेच पोलीस उपअधीक्षक नयोमी साटम यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. पोलीस दलाची सामाजिक बांधिलकी अशा उपक्रमांतून अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिबिराला पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ६० जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली, तर ५६ जणांची शुगर, रक्तदाब, ईसीजी, थायरॉईड तसेच महिलांच्या आवश्यक आरोग्य तपासण्यांसह विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सोनचाफ्याचे रोप भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असतानाही समाजहिताला प्राधान्य देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या रक्तदानातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी पोलीस दलाचा आदर्श उपक्रम…
