वाहतूक सुद्धा ठप्प:विजेचे पोल कोसळले
वेंगुर्ले : वेंगुर्ले मध्ये आज आलेल्या अचानक पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. घरोघरीं होणाऱ्या तुलसी विवाहावर पावसाचे सावट आहे. दरम्यान वेंगुर्ले कुडाळ या मुख्य रस्त्यावर मठ येथे झाडे पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मठा मध्ये चक्रीवादळ झाल्यामुळे रस्त्यावर झाडे पडून वाहतूक ठप्प तर विजेचे पोल पडून व घरांचेही नुकसान झाल्याची माहिती नायब तहसीलदार नागेश शिंदे यांनी दिली. वेंगुर्ले तालुक्यामध्ये सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट करत मुसळधार पाऊस सुरू झाला. तुळशी विवाह असल्याने बाजार पेठेत चुरमुरे व लग्नासाठी लागणारे साहित्यांची दुकाने सजली होती. तर घरोघरी तुळशी विवाहासाठी जोरदार तयारी करण्यात येत होती. मात्र अचानक पाऊस आल्याने सर्वांची तारांबळ उडाली आणि जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान मठ येथे मुख्य रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिरोडा वेंगुर्ला येथून मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसेस मठ येथून परतून दाभोली मार्गे नेण्यात आल्या आहेत. झाडे तोडून रस्ता मोकळी करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नायब तहसीलदार नागेश शिंदे व सहकारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
