तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे…

भाजप पदाधिकाऱ्यांचे आरोप

वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची वाताहत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झाली आहे. अधिकारी हे ठेकेदारांचे वकील बनले आहेत. त्यांना वकिली करण्यात जास्त रस आहे. त्यांना साधा मैलकुली ऐकत नाही. हे अधिकारी महाशय खुर्चीवर बसण्यास लायक नाहीत. असे गंभीर आरोप वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांनी करत बांधकामच्या अधिकाऱ्यांना बैठकीत सळो कि पळो करून सोडले. ऊस शेतकरी महेशकाका गोखले यांनी करूळ घाट दुरावस्थेबाबत नग्न आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी यांनी तालुक्यातील रस्ता डागडुजी बाबत बैठकीचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार रामदास झळके यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, राजेंद्र राणे, बंड्या मांजरेकर, रोहन रावराणे, पुंडलिक साळुंखे, किशोर दळवी, महेश गोखले, स्वप्नील खानविलकर, उत्तम सुतार, बाबा कोकाटे, रवींद्र गुंडये, उदय पांचाळ, पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई, नायब तहसीलदार अमित निंबाळकर, अशोक नाईक, राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता ए.एस. शिवनीवार, श्री. कुमावत, उपकार्यकारी अभियंता श्री. कांबळे,श्री. सुतार, श्री. दुडीये आदी उपस्थित होते. उंबर्डे – फोंडा रस्ता शुभारंभ प्रसंगी आमदार नितेश राणे यांना 10 नोव्हेंबर पासून काम चालू करतो असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. आमदारांची फसवणूक करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. करूळ घाटाचे खड्ड्यामुळे ऊस घेऊन जाणे मुश्कील झाले आहे. आमचा ऊस तुम्हीच घेऊन जा. मग आमची काही अडचण नाही असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. लबाड अधिकाऱ्यांच्या मिलीभगत मुळे रस्त्यांची वाट लागली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. करुळ घाटातील काम बुधवार दि. 17 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येईल. व 30 नोव्हेंबर पर्यंत ते पूर्ण होईल असे लेखी आश्वासन यावेळी अभियंता शिवनीवार यांनी दिले. तर उंबर्डे – फोंडा व उंबर्डे – भुईबावडा या रस्त्याचे दुरुस्तीचे काम 22 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येईल असे आश्वासन श्री. कांबळे यांनी याप्रसंगी दिले आहे. फोटो – वैभववाडी तहसील येथे पार पडलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारताना भाजपा पदाधिकारी.

You cannot copy content of this page