Headlines

भाजपने मतदारांची फसवणूक केली…

सौम्या रेड्डी :’व्होट बचाव… देश बचाव’ अभियान अंतर्गत सौ. रेड्डी यांची पत्रकार परिषद ;१ नोव्हेंबरला दिल्लीत होणाऱ्या सभेतील उपस्थित राहण्याचे आवाहन..

⚡कुडाळ ता २५-: खोटे बोलून, पात्र मतदारांची नावे यादीतून वगळून भाजप निवडणूक जिंकत आला आहे. देशातील अनेक पात्र मतदारांची नाव मतदारयादीतून गायब होत आहेत. त्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात ‘मत वाचवा… देश वाचवा’ अर्थात ‘व्होट बचाव… देश बचाव’ अभियान राबविले जात आहे. याच अभियानाचा भाग म्हणून येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात इंडिया आघाडीची मोठी सभा होणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस तथा सिंधुदुर्गचा समन्वयक माजी आमदार सौम्या रेड्डी यांनी केले आहे. कुडाळ येथे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात ‘मत वाचवा… देश वाचवा’ अर्थात ‘व्होट बचाव… देश बचाव’ अभियान राबविले जात आहे. त्या संदर्भात पत्रकार परिषदा घेऊन माहिती देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी सौम्या रेड्डी यांनी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, माजी अध्यक्ष साईनाथ चव्हाण, इर्शाद शेख, साक्षी वंजारी, नागेश मोर्ये, विजय प्रभू, श्री.देसाई, मेघनाथ धुरी, अभय शिरसाट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. रेड्डी यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणूक आयोगाला मत चोरी बाबत प्रश्न विचारत असताना त्याची उत्तरे भाजप का देतो आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. व्होट बचाव, देश बचाव’ हे काँग्रेस पक्षाने ऑक्टोबर २०२६ मध्ये जाहीर केलेले देशव्यापी राजकीय अभियान आहे. मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, पात्र मतदारांची नावे वगळली जाणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवरून काँग्रेसने राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केले आहे. मतदानाचा हक्क जपा आणि लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करा असा या अभियानाचा मुख्य संदेश आहे असे सौ. सौम्या यांनी सांगितले.
भाजप निवडून आल्यावर अच्छे दिन येतील असे सांगितले गेले. पण अदानी, अंबानी यांना सोडून कोणालाच अच्छे दिन आले नाहीत अशी उपहासात्मक टीका त्यानी केली. काँग्रेसच्या मते, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अर्थात SIR मध्ये अनेक पात्र मतदारांची नावे वगळली गेली आहेत. त्यामुळे संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क गमवावा लागू शकतो, अशी पक्षाची चिंता आहे. याबद्दल त्यांनी कर्नाटकातील महादेवपूर येथील निवडणुकीचे उदाहरण दिले. त्या ठीकाणी दीड लाखापेक्षा जास्त मते फेक असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात ३९ लाख मतदारांची फेक नावे भाजपने समाविष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करावीत.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करावी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावे अशा मागण्यांचा समावेश असल्याचे सौ. सौम्या रेड्डी यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपच्या आदेशाप्रमाणे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. इतर दोन निवडणूक आयुक्तांनी याला आक्षेप घेतला तरी ज्ञानेशकुमार राजीनामा देत नाहीत, असे सौ. रेड्डी यांनी सांगितले.
एसआयआर प्रक्रियेवर त्यांनी जोरदार टीका केली. या प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे वगळली गेली आहेत. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेतील वैधता आणि नियमपालन याबाबतचे प्रश्न स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे. पण असे होताना दिसत नाही असे त्या म्हणाल्या. कर्नाटक सारख्या भाजप सरकार नसलेल्या राज्यात सुद्धा मतदार याद्यांमध्ये घोळ घालण्यात आला आहे, नाहीतर त्या ठिकाणी इतर पक्षांचे आमदार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले असते असेही सौ. रेड्डी यांनी एका प्रश्नाच्या उत्तराप्रसंगी सांगितले.
त्यामुळेच भाजपच्या या भूमिकेविरोधात देशातील प्रत्येक जिल्ह्यात ‘मत वाचवा… देश वाचवा’ अर्थात ‘व्होट बचाव… देश बचाव’ अभियान राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा होणार आहे. त्या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सौ. रेड्डी यांनी केले.

You cannot copy content of this page