⚡बांदा ता.२५-: बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने डॉ. संजय बर्वे पुरस्कृत (कै.) शोभना काशिनाथ बर्वे यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली मनाचे श्लोक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या पाठांतराचे आणि सादरीकरणाचे कौशल्य दाखविले. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, एकाग्रता आणि मनाचे श्लोक याविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्रमांक १ चा विद्यार्थी सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर याने प्रथम क्रमांक पटकावला. आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी येथील पूर्वी प्रशांत परब हिने द्वितीय, तर कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी येथील अर्णव अश्विन काकतकर याने तृतीय क्रमांक मिळविला. जिल्हा परिषद केंद्रशाळा इन्सुली क्रमांक ४ येथील दिव्या नारायण मेस्त्री हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथील राशी ज्ञानेश्वर दळवी हिलाही उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण रामकृष्ण वामन पेळपकर आणि अनंत जनार्दन भाटे यांनी केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक सादर करताना दाखविलेली तयारी आणि उत्साह यामुळे स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, गौरव बर्वे, नागेश सावंत, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती, संस्कार आणि मराठी साहित्याची आवड रुजविण्यासाठी नट वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. मनाचे श्लोक स्पर्धेच्या आयोजनातूनही विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात आयोजित मनाचे श्लोक स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.

