प्रदीप कबरे यांचा ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते सत्कार
मालवण दि प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण ,संचलित सानेगुरुजी वाचन मंदिर आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते प्रदीप कबरे यांचा मनामनातलं अभिवाचन- खिडकी हा कार्यक्रम बॅ. नाथ पै सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमाचा हा रौप्य महोत्सवी २५ वा प्रयोग होता. मनामनातलं अभिवाचन – खिडकी या कार्यक्रमात आपल्या अमोघ वाणीतून खिडकीतल जग उलगडून सांगताना प्रदीप कबरे यांनी रसिकांना खिळवून ठेवले. यावेळी लेखक प्रदीप कबरे यांचा आयोजकांच्या वतीने सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, नितीन वाळके, स्वराध्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पवार, सचिव अभय कदम, रुपेश नेवगी, सचिन टिकम, रुजरिओ पिंटो, महेश काळसेकर, ग्रंथपाल ऋतुजा केळकर आदी व इतर उपस्थित होते. खिडकी ही फक्त घराचीच नसते. दैनंदिन जीवनात घराच्या खिडकीसह गाडीच्या, रेल्वेच्या, रिक्षाच्या विविध खिडकिंमधून पाहिलेली दृश्ये व त्यांचे अर्थबोध कबरे यांनी यावेळी सांगितले. वेगवेगळ्या खिडकी मधील दृश्यांमधून आलेले सामाजिक, राजकीय अनुभव आणि त्याचे आपल्या मनावर आणि जीवनावर झालेले परिणाम श्री. कबरे यांनी यावेळी अभिवाचनातून कथन केले. उपस्थित रसिकांनी या अभिवाचनाला भरभरून दाद दिली.
