मालवण दि प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन, निसर्गाचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ या संस्थेच्या प्रतिनिधींनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
हवामान बदलाचे परिणाम कमी करणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि निसर्ग संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांना चालना देणे, या अनुषंगाने या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले. पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात युवकांचा सहभाग वाढविणे आणि पर्यावरणविषयक जनजागृतीला प्रोत्साहन देणे, यांसारख्या विषयांवरही या भेटीच्या माध्यमातून विचारविनिमय करण्यात आला.
या वेळी ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’चे संस्थापक अध्यक्ष मेगल डिसोझा, उपाध्यक्ष स्वाती पारकर, सचिव ॲड. ऐश्वर्य मांजरेकर, सदस्य दर्शन वेंगुर्लेकर आणि राहुल जाधव उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संस्था आणि प्रशासन यांच्यातील संवाद व समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

