*⚡कणकवली ता.१४-:* कोविड निर्बंध शिथिल झाल्यावर कणकवली येथे नाटकांमध्ये स्त्री पात्र साकारणाऱ्या भालचंद्र मेस्त्री गुरुजी यांनी लिहिलेल्या नाट्य आणि कला प्रवासावर आधारित “मेस्त्री गुरुजी” या पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हे पुस्तक लिहिताना लेखकाने आशयाचे भान ठेवत अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये काही दशकांपूर्वीच्या कोकणातील नाट्य चळवळ वाचकांना उपलब्ध केल्याचे डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी नमूद केले. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी , जेष्ठ साहित्यीका डॉ. सई लळीत तसेच कलमठ येथील श्री. सुनील नाडकर्णी हे विशेष उपस्थित होते . पूर्वीच्या अखंड रत्नागिरी आणि नंतर सिधुदुर्ग जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करताना मेस्त्री गुरुजी यांनी खेड, धामणी, राजापूर, देवाचे गोठणे, कलमठ, मुणगे अश्या विविध ठिकाणी स्थानिक नाट्य मंडळा मधून अनेक स्त्री पात्र भूमिका साकार केल्या,तसेच नाट्य दिग्दर्शन केले व नेपथ्य केले होते. एक पुरुष कलावंताला नाटकांमध्ये स्त्री पात्र करताना आलेल्या अनेक आकस्मिक अडचणी तसेच कोकणातील नाट्य मंडळींचे कलेवरील अपार प्रेम आणि त्याकरिता मिळणारी समाजाची साथ याची अनेक उदाहरणे देत हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहे . पुस्तकाच्या आशयाला अनुरूप असे मुखपृष्ठ मनोज मेस्त्री यांनी केले असून पुस्तकाची मांडणी अतिशय आगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे . मेस्त्री गुरुजी केवळ नाट्यकला यात गुंतून न राहता साने गुरुजी कथामाला, विज्ञान प्रदर्शन, गीतमंच, एकांकिका स्पर्धा यात सहभागी होत त्यांनी अनेक कलावंत तयार केले. हे पुस्तक केवळ एका मनस्वी कलाकाराचे मनोगत नसून तत्कालीन सामाजिक परिस्थिती, ग्रामीण सहजीवन आणि पुरुष कलावंताने स्त्री पात्र करताना असणारी आव्हाने अत्यंत सहजतेने आपल्या समोर आणण्यात यशस्वी झाल्याचे डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी या प्रसंगी सांगितले . डॉ .सई लळित यांनी कलेचे जीवनातील महत्व अधोरेखित करताना मेस्त्री गुरुजींना त्यांच्या पत्नीने दिलेल्या खंबीर साथीबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. प्रसिद्धीच्या मोहात न गुरफटता केवळ कला उपासना करत विद्यार्थी घडवणारे मेस्त्री गुरुजी हे कलमठ कणकवलीसाठी प्रेरणादायी आहेत अशा भावना सुनील नाडकर्णी यांनी भावना मांडल्या. या प्रसंगी शॉर्टफिल्ममेकर शशिकांत कांबळी आणि नाट्यकलाकार निलेश पवार या मेस्त्री गुरुजींच्या माजी विद्यार्थ्यानी तयार केलेली डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली. या सोहळ्याची सुरुवात पं. समीर दुबळे यांचे शिष्य मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय ख्याल गायनाने झाली. त्यानंतर मेस्त्री गुरुजींच्या नातवंडांनी आरोही, मेहा सोबत हीच आमची प्रार्थना या स्वागत गीताने रसिकांना प्रफुल्लित केले. प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक उल्का मेस्त्री- पुरोहित यांनी तर आभार प्रदर्शन श्राव्या मेस्त्री यांनी केले. या पुस्तक प्रकाशनाकरिता ज्येष्ठ रंगकर्मी उदय पंडित तसेच आम. वैभव नाईक यांचेसोबत रत्नागिरी सिधुदुर्ग मधील अनेक कलाप्रेमी, रंगकर्मी आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन विनायक मेस्त्री यांनी केले.
भालचंद्र मेस्त्री यांच्या नाट्य व कला प्रवासावर आधारित “मेस्त्री गुरुजी” पुस्तकाचे प्रकाशन
