तुळशी वृंदावने नटू लागली

निमित्त विवाहाचे:सोमवार पासून तुळशी विवाह सुरू

कुडाळ ता.११ संदीप चव्हाण-:* दिवाळीनंतर तुळशी विवाहाचे वेध लागले आहेत सोमवार दिनांक १५नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत असून १९ नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती असल्याने अंगणात लक्ष वेधून घेणारे तुळशी वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी सुरू झाली आहे. भारतीय संस्कृती ही मुळातच भावात्मकता प्रधान आहे. त्यामुळे तुळशीला हिंदू संस्कृतीत कन्येचे स्थान दिले जाते तुळशीची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होत असल्याचा समज असल्यामुळे पोटच्या कन्येला उत्तम वर मिळावा तिला सर्व सुख प्राप्त व्हावे यासाठी बहुतांश नागरिक आनंदाने हा उत्सव साजरा करतात. कार्तिकी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी सायंकाळी तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात येते मात्र बहुतांश नागरिक विवाहासाठी द्वादशीचा दिवस निवडतात. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते. तुलसी विवाहासाठी अंगणात आकर्षक वाटणार्‍या तुळशीवृंदावन घडविण्यात अनेक कारागीर मग्न असल्याचे दिसून येत आहे तर अंगणात लक्ष वेधून घेणारे वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी सुरू झाली आहे विविध आकर्षक रंगांनी वृंदावन मांडणी करण्यात येत आहे विवाहा दिवशी सकाळी तुळशीला हळद चढवून सर्व सौभाग्य अलंकारांनी सजविले जाते व दुपारी महानैवेद्य दाखवून तुळशीत चींचा,आवळे ठेवले जातात. उसाचे वाड, दिंडा,बांबूची काठीने तुळशी वृंदावन सजविले जाते. तुळशीवृंदावनाच्या आजूबाजूला विविध प्रकारच्या रांगोळ्या तसेच पणत्या लावल्या जातात, त्यानंतर सायंकाळी परंपरेनुसार पुरोहितांच्या मंत्रोच्चारात तुळस व बाळकृष्ण या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हणून त्यांचा विवाह लावला जातो तद्नंतर घरातील सुवासिनी खण नारळ सुपारीने तुळशीची ओटी भरतात घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा यामागील हेतू आहे.सोमवार दिनांक १५ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ होत असून १९ नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीत सर्वत्र तुळशी विवाहाचा सोहळा दिसून येणार आहे. तुळशी विवाहानंतर सर्वत्र शुभमंगल सावधानचा ध्वनी कानी पडण्यास सुरुवात होणार आहे.

You cannot copy content of this page