मालवणात एस टी कर्मचारी भूमिकेवर ठाम
मालवण : (प्रतिनिधी) एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण व्हावे यासह इतर मागण्यांसाठी कालपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी छेडलेले कामबंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनात मालवणातील एसटी चालक वाहक यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले असून आमच्यावर कारवाई झाली तरी बेहत्तर, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची आक्रमक भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने तसेच परिस्थितीला कंटाळून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडत असताना आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात मालवण मधील एसटी कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्या जो पर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी कारवाई झाली तरी चालेल, पण मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही एसटी कर्मचाऱ्यांनी आज दिला. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी मालवण आगारातून स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. एसटी सुरू होईल या आशेने अनेक प्रवासी एसटी स्टँड परिसरात फेऱ्या मारत आहेत. तर अनेकांनी रिक्षा व इतर खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास केला. मात्र खासगी वाहतूक खिशाला परवडत नसल्याने प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
