ओटवणे फाटाजवळ बेकायदा दारू वाहतुकीविरोधात कारवाई

*⚡बांदा ता.०९-:* गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने महिंद्रा पीक अप गाडीतून होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई करत २ लाख ७६ हजार २४० रुपये किमतीच्या दारुसह एकूण ७ लाख ७६ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक सचिन दगडू कोरवी (वय २७, रा. गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, रत्नागिरी निरीक्षक व्ही. एस. मोरे, दुय्यम निरीक्षक एस ए भगत, जवान डी एस कालेलकर, जी एल राणे, आर डी ठाकूर यांच्या पथकाने ओटवणे फाटा सापळा रचला होता. तपासणी करताना गाडीच्या (एमएच ०९ ईएम ३९६५) पाठीमागील डिकीत बेकायदा दारूचा साठा करण्यात आला होता. मुद्देमाल जप्त करत चालकावर अटकेची कारवाई करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील करत आहेत.

You cannot copy content of this page