वैभववाडी ग्रामसेवक युनियनचे तहसीलदार यांना निवेदन
वैभववाडी प्रतिनिधी ग्रामसेवकांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदार संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा वैभववाडी यांच्या वतीने तहसीलदार रामदास झळके यांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी आज काम बंद आंदोलन करत या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. औरंगाबाद येथे महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी औरंगाबाद पश्चिम चे आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्च भाषा वापरली व शिवीगाळ केली. ग्रामसेवक हे भामटे आहेत. महिला सरपंचांची फसवणूक करतात. व ते हरामखोर आहेत. असे वक्तव्य त्यांनी केले. यामुळे राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. लोकप्रतिनिधी असे वक्तव्य कसे करू शकतात? त्यांना भानावर आणणे गरजेचे आहे. राज्यभर ग्रामसेवक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. आ. शिरसाट यांनी त्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी असे निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ग्रामसेवक तणावाखाली आहेत. त्यांची प्रचंड मानहानी झालेली आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यामध्ये तेढ निर्माण झालेले असून अविश्वासाचे वातावरण तयार झालेले आहे. अशा अपप्रवृत्तीचा बिमोड होणे गरजेचे आहे. असे निवेदनात म्हटले आहे. संबंधित आमदारावर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष विद्याधर सावंत, ग्रामसेवक गजानन कोलते, दशरथ बोडेकर, सचिन कांबळे, संभाजी वाघमोडे, नयना गुरखे, शशिकांत गुरव, ए.जे. कांबळे, रवींद्र गोसावी व ग्रामसेवक उपस्थित होते.
