पायावरुन रेल्वे गेल्याने रक्तस्राव : मडुरा रेल्वे स्थानकावरील घटना
*⚡बांदा ता.०८-:* कोकण रेल्वेच्या मडुरा रेल्वे स्थानकावर ट्रॅकचे काम करणार्या परप्रांतीय कामगाराच्या पायावरुन रेल्वे गेल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. पिंटू भूईया (४०, रा. औरंगाबाद, बिहार) असे त्या कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दारुच्या नशेत तो ट्रॅकवर गेला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस हवालदार दीपक लोंढे, सिद्धेश बरगे व चालक बर्डे मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाले. बिहार येथील ७ परप्रांतीय कामगार झोपडी करुन मडूरा रेल्वे स्थानकावर राहतात. ते ट्रॅक दुरुस्तीचे काम करीत होते. रात्री मयत कामगार हा दारुच्या नशेत प्लॅटफॉर्मवर फिरत असताना तोल जाऊन ट्रॅकवर खाली कोसळला. त्याचवेळी रेल्वेखाली डावा पाय आल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. बांदा पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत नातेवाइकांची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलीसांनी सांगितले. बांदा पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
