आगारांमधील कर्मचारी संपात सहभागी : काम बंद आंदोलन सुरू
*⚡कणकवली ता.०८-:* दिवाळी सुरु होण्यापूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पेटलेली ठिणगी अद्याप शांत झालेली नाही.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व इतर मागण्यांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या संपामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कर्मचारीही सोमवारपासून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती. विविध मागण्यांसाठी सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्रित येत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेमुदत उपोषण सुरू केले होते. यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार उपोषण मागे घेण्यात आले असले तरीही महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची मागणी होती. त्यामुळे या मागणीसाठी गेले बारा दिवस राज्यभरात ठिकठिकाणी काम बंद सुरू करण्यात आले होते. सिंधुदुर्ग विभाग मात्र यात सहभागी झालेला नव्हता. परंतु सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत सोमवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने एसटी महामंडळाची संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. येथील बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत महामंडळाचे शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे यासाठी जोरदार घोषणाबाजीही केली.सिंधुदुर्ग विभागामध्ये सोमवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णत कोलमडली असल्याचे सांगण्यात आले. यामुळे सकाळच्या सत्रात शासकीय सेवेत जाण्यासाठी बसस्थानकावर आलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान सकाळच्या सत्रात विजयदुर्ग आगारातील काही किरकोळ बसेस वगळता संपूर्ण वाहतूक ठप्प झाली असल्याचे सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने संघटनेननी आक्रमक भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आजपासून सिंधुदुर्गातही एसटी कर्मचाऱ्यांनी संपात उडी घेत चक्काजाम आंदोलन हाती घेतले आहे.सर्वच आगारांमधून एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या असून यामुळे प्रवाशांचे बेहाल झाले आहेत.सर्वच बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ ,वेंगुर्लेसह सर्वच आगारासह सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी ९ वाजल्यापासूनच सरकारविरोधात घोषणा देत संपाला पाठींबा देत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला आहे. राज्यातील सर्वच आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची घोषणा केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र करण्यात आल्याने दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या प्रवाशांना परतीच्या मार्गात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकार या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रकरणी नेमकी काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
