पर्यटकांना करावी लागली खड्डेमय रस्त्यातून सफर

मालवण दि प्रतिनिधी पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या मालवण- तारकर्ली- देवबाग रस्त्याची खड्ड्यांमुळे पुरती वाट लागली असून दिवाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी तारकर्ली देवबाग मध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्यातून ये जा करावी लागत असल्याने पर्यटकांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मालवण तालुक्यातील खड्डेमय रस्त्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी घेतलेली जबाबदारी बोलाची कढी आणि बोलाचा भात या प्रकारातील होती काय असा सवाल मनसे मालवण तालुकाध्यक्ष श्री विनोद सांडव यांनी उपस्थित केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या मालवण मधील वायरी, तारकर्ली व देवबाग या किनारी गावांमध्ये खऱ्या अर्थाने पर्यटकांना ओघ मोठ्या प्रमाणात असतो. मात्र या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे पुरती दुर्दशा झाली आहे. गेली कित्येक वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसून खडीकरण व डांबरीकरण काम केवळ आश्वासनापुरते राहिले आहे. हा रस्ता अरुंद असल्याने पर्यटन हंगामात वाहतूक कोंडीची समस्यांही डोकेदुखी ठरत आहे. खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्ती बाबत स्थानिक ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी आवाज उठविला जात असताना तसेच आंदोलने छेडली जात असताना अद्यापही शासनाकडून मंजूर असलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. यावर्षी पावसाळ्यात खड्डे व चिखलाच्या साम्राज्यात ग्रामस्थांना ये- जा करावी लागली होती. खड्ड्यांमुळे मणक्याचे आजारही वाढीस लागण्याची भीती आहे. या रस्त्याचे काम होत नसल्याने या मार्गावर आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात “खड्ड्यांचे वैभव” अशी शेरेबाजी करणारे बॅनरही झळकले होते. मालवण तालुक्यातील रस्ता कामांची जबाबदारी आमदार म्हणून आपलीच आहे असे सांगत आमदार नाईक यांनी देवबाग रस्त्यासह इतर रस्त्यांची कामे दसऱ्यानंतर सुरू होतील असे सांगितले होते. मात्र आता दसरा होऊन दिवाळीही संपली तरी रस्ता कामांचा पत्ता नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. अशातच सध्या पर्यटकांचा ओघ वाढल्याने खड्ड्यांमधून कसरत करीत पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक रिक्षा व्यावसायिकांनी देखील तारकर्ली देवबाग रस्त्याच्या दुर्दशेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत या मार्गावरील भाडे मारताना रिक्षा चालकांना स्वतःसह रिक्षाचीही काळजी घेत प्रवास करावा लागत आहे. तर मोटरसायकलस्वारानाही मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुर्दशेबाबत पर्यटक, स्थानिक वाहनचालक, रिक्षाचालक यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान, खड्डेमय देवबाग रस्त्याचे काम होणार कधी ? गेली अनेक वर्षे केवळ स्वप्नवत आश्वासन बनलेल्या या रस्त्याच्या दुरुस्ती व हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम अद्यापही स्वप्नच बनून राहिले असून आमदार वैभव नाईक यांनी “रस्त्यांची जबाबदारी आपली” असे म्हणत रस्ता काम करण्याचे दिलेले आश्वासन रस्त्यावरील खड्ड्यातच गाडले गेले की काय ? असा सवालही मनसे मालवण तालुका अध्यक्ष श्री विनोद सांडव यांनी उपस्थित केला जात आहे.

मालवण-तारकर्ली-देवबाग रस्त्याची दयनीय अवस्था;पर्यटकांतून व्यक्त होतेय तीव्र नाराजी

You cannot copy content of this page