कुंभवडे येथील मंदिरातील दानपेट्या अज्ञात चोरट्याने फोडल्या

*८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

*⚡वैभववाडी ता.०६-:* वैभववाडी तालुक्यातील करूळ कुंभवडे येथील एकविरा मंदिरातील दोन दानपेट्या फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व घंटा असा मुद्देमाल चोरून नेला आहे. चोरट्याने करूळ भोयडेवाडी येथील गणपती मंदिर, करूळ गावठाण येथील केदारलिंग मंदिर तसेच कुंभवडे येथील एकविरा देवी मंदिर या मंदिरांच्या दान पेट्या फोडल्या. याबाबत कुंभवडे येथील एकविरा मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष एकनाथ काशीराम राऊत यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंभवडे येथील एकविरा मंदिराचे अध्यक्ष एकनाथ काशीराम राऊत हे शुक्रवार दि.५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मंदिराचे दरवाजे बंद करून घरी गेले होते. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास राऊत हे मंदिर उघडण्यासाठी आले असता त्यांना मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेल्या स्थितीत दिसून आले. म्हणून त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात पाहिले असता दानपेटी फोडलेली दिसली. या दानपेटीतील रक्कम चोरीस गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत राऊत यांनी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. याचवेळी करूळ येथील दीपक गणपत पाटील व प्रताप मनोहर पाटील यांनी करूळ भोयडेवाडी येथील गणपती मंदिर व करूळ गावठाण येथील केदारलिंग मंदिर या दोन मंदिरात दानपेटी तोडल्याची माहिती दिली. कुंभवडे येथील एकविरा मंदिरातून दानपेटीतील ५ हजार रुपये रोख, करूळ गणपती मंदिरातून २ हजार रुपये रोख व दोन पितळी घंटा तसेच केदारलिंग मंदिरातील दानपेटीतून पाचशे रुपये रोख असा ८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. करूळ व कुंभवडे येथील मंदिरांमध्ये सुमारे दोन किल्लोमीटर अंतर आहे. तीनही मंदिरातील चोरीची पद्धत एकच असल्याने अज्ञात चोरट्यानेच या चोऱ्या केल्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.पोलिसांनी श्वान पथक व ठस्से तज्ञांना पाचरण केले आहे.परंतु सायंकाळी उशीरापर्यंत ही पथके वैभववाडीत दाखल झाली नव्हती. एकाच दिवशी करुळ येथील दोन व कुंभवडे येथील मंदिराच्या दान पेट्य फोडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून वैभववाडी पोलिसांकडून तालुक्यातील सर्व मंदिरातील दान पेट्यातील रक्कम काढून घेऊन दान पेट्या रिकामी कराव्यात अशी सूचना सर्व देवस्थान समितीना करण्यात आली आहे.अशी माहीती वैभववाडी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांनी दिली.

You cannot copy content of this page