नवरंगचा पाडवा पहाट संगीत प्रेमींच्या उपस्थितीत संपन्न
*⚡सावंतवाडी ता.०५सहदेव राऊळ-:* ‘नवरंग’ च्या वतीने आयोजित ‘पाडवा पहाट’ ची पहाट गायक स्वप्नील गोरे व गायिका दिव्या शेवडे यांच्या सुमधुर नाट्यगीत गायनाने असंख्य संगीतप्रेमींच्या उपस्थितीत सजली. एकापेक्षा एक सरस नाट्यगीत सादर करून दोन्ही गायकांनी रसिकांची वाहवा मिळवली. दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी नवरंगच्यावतीने ‘पाडवा पहाट’ हा हा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला जातो. कार्यक्रमाचे यंदाचे हे सोळावे वर्ष आहे. नगरपालिकेच्या काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहात संगीतमय वातावरणात असंख्य संगीतप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी व्यासपीठावर श्रीपाद चोडणकर, गायक स्वप्नील गोरे, दिव्या शेवडे, निलेश मेस्त्री, बाळ पुराणिक, किशोर सावंत आदी उपस्थित होते. यावर्षी नवरंगच्यावतीने गायक स्वप्नील गोरे व दिव्या शेवडे यांना आमंत्रित करण्यात आली होते. पाडवा पहाट कार्यक्रमाची सुरुवात पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने झाली. त्यानंतर दिव्या शेवडे यांनी सृजन कसा मन चोरी (संगीत स्वयंवर) हे नाट्यगीत सादर केले. त्यानंतर स्वप्नील गोरे यांनी एक नाट्यगीत सादर केले. त्यानंतर दिव्या शेवडे यांनी आपदा राजपदा भयदा (संगीत रणदुंदुभी), स्वप्नील गोरे यांनी घेई छंद मकरंद (संगीत कट्यार काळजात घुसली), दिव्या शेवडे यांनी नयने लाजवीत (संगीत मानापमान), स्वप्नील गोरे यांनी श्रीरंगा कमलाकांता (नाटक होनाजी बाळा) आदी नाट्यपदे सादर करून उत्तरोत्तर कार्यक्रमात रंगत आणून उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली. स्वप्नील गोरे यांनी गियिलेल्या सर्वात्मका सर्वेश्वरा (ययाती आणि देवयानी) या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. दोन्ही गायकांना ऑर्गनसाथ निलेश मेस्त्री व तबला साथ किशोर सावंत यांनी करत कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. कार्यक्रमाचे सुमधुर सूत्रसंचालन बाळ पुराणिक यांनी केले. नवरंगच्यावतीने दोन्ही गायकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
