मालवण तालुक्यातील पहिल्या मिनिप्लेक्सचे 5 नोव्हेंबरला उद्घाटन

मालवण : (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील देवबाग मध्ये पी अँड पी समूह प्रायव्हेट लिमीटेड व देवबाग ग्रामपंचायत यांच्या वतीने मालवण तालुक्यातील पहिले मिनिप्लेक्स निर्माण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शुक्रवार दि. ५ नोव्हेंबर होणार आहे. यानिमित्ताने कळसूत्री बाहुल्या, दशावतार आणि गजानृत्य या कोकणातील तिन्ही पारंपरिक कलांचे एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण पहाण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. तसेच नवे हिंदी आणि मराठी चित्रपट पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. देवबाग ग्रामपंचायतीच्या मत्स्यगंधा हॉल मध्ये या मिनिप्लेक्स थिएटरचे निर्माण करण्यात आले आहे. १३७ आसन क्षमता आणि सोबतच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी सोफा कोच अशी व्यवस्था असलेला छोटेखानी मिनिप्लेक्स याठिकाणी साकारण्यात आला आहे. येथे २६x११ चौरस फुटांचा भव्य स्क्रीन, ३०x१५ चौरस फुटांचा स्टेज, अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, आकर्षक लाईट सिस्टीम, पुशबॅक चेअर्स, वातानुकुलित यंत्रणा, जनरेटर बॅकअप त्याचप्रमाणे स्वच्छतागृह यासारख्या पंचतारांकित व्यवस्था उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या पंचतारांकित मिनिप्लेक्स मध्ये आठवड्यातील काही विशिष्ट दिवस सिंधुदुर्गातील हौशी तसेच व्यावसायिक कलाकारांच्या प्रत्यक्ष सादरीकरणातून येथील पारंपारिक कलांचा आनंद लुटता येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योजक, व्यावसायिक यांना त्यांच्या कंपनीच्या मीटिंग, बोर्ड मीटिंग, डॉक्यूमेंट्री किंवा सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन येथे करता येणे शक्य आहे. छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमही येथे आयोजित करण्याची संधी देण्यात येणार असून पर्यटनाबरोबर व्यवसायिक वृद्धीसाठी आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठीही या मिनीप्लेक्सचा वापर माफक दरात उपलब्ध होणार आहेत. या मिनीप्लेक्सचे उद्घाटन शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी देवबाग सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युनियन बँक ऑफ इंडियाचे मालवण येथील शाखा व्यवस्थापक राम गोपाल यादव, कणकवलीचे शाखा व्यवस्थापक कृष्णकांत सातोसे उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून बुधवारी ३ नोव्हेंबर रोजी येथे सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली असून शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वा. पासून हिंदी व मराठी सिनेमा येथे प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून नवीनच प्रदर्शित होणारा सूर्यवंशी हा चित्रपट येथे प्रदर्शित होणार असल्याची माहिती पी अँड पी समूह प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page