अभ्यासक विनोद तांबे यांचे प्रतिपादन
वैभववाडी प्रतिनिधी मनुष्याचे आरोग्य बिघडण्यास विविध गोष्टी कारणीभूत आहेत. सदृढ आरोग्यासाठी विषमुक्त अन्न आवश्यक बनले असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत सेंद्रिय शेतीचे अभ्यासक विनोद तांबे यांनी येथे व्यक्त केले. मंडळ कृषी अधिकारी विवेकानंद नाईक यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त कोकिसरेतील शेतकरी रमेश गुरव यांना वैभव कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रवण फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, सचिन कांबळे, एस. के. गुरव, सीमा नानिवडेकर, श्री. नाईक, महेश संसारे आदी उपस्थित होते. तांबे म्हणाले, शेतीमध्ये वेगवेगळ्या घटकांची गरज असते, परंतु आपण शेतकऱ्यांनी जमीन, झाड आणि कीड या तीन गोष्टीँकडे लक्ष देण्याची गरज असते. ५० वर्षापूर्वी जमिनी सुपिक होत्या. परंतु रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अवास्तव वापरामुळे त्या जमिनीचे आरोग्य ढासळले आहे. जमिनीचा पोत जर चांगला नसेल तर उत्पादन देखील मिळणार नाही. त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीचा पोत सुधारला पाहिजे. झाडाला प्रमुख खतांसोबत दुय्यम आणि सूक्ष्म अन्न द्रव्यांची गरज असते. तितकीच खते आपण दिली तर झाडाचे आरोग्य उत्तम राहिल. एकात्मिक कीड व्यवस्थापन शेतकऱ्यांनी केले पाहिजे. अशा शब्दांत सभापती अक्षता डाफळे यांच्यासह उपस्थितांनी नाईक यांच्या स्मृती जागविल्या.
