खा राऊत यांचा नारायण राणेंच्या भाषणाचा धागा पकडत मागणी
मालवण दि प्रतिनिधी जिल्हा भाजप मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना “गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच दुसरे काही करायला लावू नका” असे सांगत कार्यकर्त्यांना मारण्याची, त्यांचे जीवन संपविण्याची धमकी दिल्याने रक्तरंजित राजकारणाचा भूतकाळ असणाऱ्या नारायण राणे यांच्यामुळे पुन्हा रक्तलांच्छित राजकारण निर्माण होऊ शकते असे त्यांच्या भाषणावरून दिसून येते अशी भीती व्यक्त करत रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार आहोत. राणेंच्या धमक्यांमुळे, गुंडगिरीमुळे जुन्या जाणत्या भाजप कार्यकर्त्याचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी आपण पंतप्रधानाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले मालवण शहरात विविध कामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल चढविला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, नागेंद्र परब, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी व इतर उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, कुडाळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री असणाऱ्या नारायण राणे यांनी आपण केंद्रीय मंत्री असल्याचे भान विसरून कार्यकर्त्यांना मारण्याची किंबहुना त्यांची जीवन संपविण्याची धमकी दिली आहे. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेली धमकी ही विचार करायला लावणारी आहे. राणेंचा इतिहास पाहिला तर प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या लोकांचे जीवन संपवायचे डोकी फोडायची, रक्तरंजित राजकारण करायचे हा राणेंचा इतिहास होता. २०१४ पासून या भागात शिवसेनेने विजय मिळविल्यानंतर निवडणुकीत नरबळी देणे , डोकी फोडणे असे प्रकार झाले नाहीत परंतु कालच्या भाजपच्या मेळाव्यातील राणेंच्या भाषणातील अर्थ पाहिला तर पुनश्च रक्तलांच्छित राजकारण होऊ शकते असे दिसते. राणेंच्या भाषणामुळे जुने जाणते भाजपचे कार्यकर्ते संकटात आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून राणे कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप करीत खासदार राऊत म्हणाले भाजप मधील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक हे त्यांना कंटाळून गप्प बसले आहेत. यावेळी खासदार राऊत म्हणाले, केंद्रात मंत्री असल्याचे भान नारायण राणेंना राहिलेले नाही. केंद्रात मंत्री होऊनही चेंबूर मधील हऱ्या नाऱ्या जोडीतील नाऱ्या हा शब्द अजूनही नारायण राणे यांच्या डोक्यात घुमतोय. म्हणूनच ते पुन्हा दादागिरीची भाषा करत आहेत. केंद्रात मंत्री असणाऱ्या व्यक्ती अपप्रवृत्तीने बेताल वक्तव्य करतात हे पंतप्रधानांचे दुर्दैव आहे. या गोष्टी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देणे हे आमचे काम आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केल्यानंतर माझ्या तक्रारीवर उत्तर देत पंतप्रधानांनी दखल घेतली होती. आता भाजप कार्यकर्त्यांना मारण्याची धमकी देणाऱ्या राणेंबाबत पंतप्रधानांनी गंभीर दखल घ्यावी, अशी माझी मागणी आहे, असेही खा. राऊत म्हणाले. यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी नारायण राणे यांची रक्तरंजित राजकारण करण्याची पद्धत पुन्हा एकदा सुरू होत आहे. ज्या पद्धतीने एक केंद्रीय मंत्री कार्यकर्त्यांना आव्हान देतो ती गंभीर गोष्ट असल्याचे सांगून ते म्हणाले जिल्ह्यात श्रीधर नाईक, अंकुश राणे, मणचेकर असे राजकारणातून झालेले खून पुन्हा सुरू करायचे अशी असुरी इच्छा राणे व त्यांच्या कुटुंबियांची असल्याची टीकाही त्यांनी केली ही टीका करतानाच श्री राऊत यांनी यापासून जिल्हा वासीयांनी सावध राहावे, असेही ते म्हणाले. खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, चिपी विमानतळाची धावपट्टी शिवसेनेने वाढवून दाखवावी असे आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांना आम्हीच प्रतिआव्हान देत आहोत. विमानतळाची कमी केलेली धावपट्टी ही तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनीच कमी केल्याचे राणे यांनी सिद्ध करू दाखवावे असे आमचे आव्हान असून ते सिद्ध केल्यास आम्हाला जे शासन दिले जाईल ते आम्ही स्वीकारू. विमानतळाच्या नावाखाली ९३४ हेक्टर जमीन नारायण राणे हडप करू पाहत असल्यामुळेच त्यावेळी ग्रामस्थानी आंदोलने केली होती. व त्यास शिवसेनेने पाठिंबा दिला होता. विमानतळाचे काम केवळ एमआयडीसी कडे दिले असते तर हे चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले असते. मात्र त्यावेळी राणेंनी या कामात भागीदारी, टक्केवारी करता यावी म्हणून आयआरबी या खासगी कंपनीला काम देण्याचा हट्ट केला. राणेंची ही भागीदारी आम्ही दाखवून देऊ. राणेंच्या हट्टामुळेच आयआरबीकडे विमानतळ गेले आयआरबीने विमानतळ आणि महामार्गाच्या कामाचीही वाट लावल्याचा आरोप त्यांनी केल
