भाताला कोंब येण्याची शक्यता : बळीराजाची धाकधूक वाढली
*⚡बांदा ता.३१-:* बांदा दशक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पावसाची संततधार संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत अधूनमधून सुरूच होती. भात कापणी करून ठेवलेले पीक भिजल्याने वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्ण पावसाळ्यात वाचून हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याची भावना बळीराजाने व्यक्त केली आहे. भात कापणी करावी की होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहावे अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. पुढील दोन दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास भात पिकाची नासाडी होणार एवढे मात्र निश्चित.
