काँग्रेसने घेतली वीज वितरण कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी;कुडाळ-मालवण बाबत केली चर्चा
मालवण (प्रतिनिधी) कोरोना काळात वीज मीटर रीडिंग अवाच्या सव्वा वाढल्याने नागरिकांच्या अनेक तक्रारी विद्युत कंपनीला गेल्या आहेत. याबाबत मालवण व कुडाळ मधील काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाने एमआयडीसी येथे वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन कुडाळ व मालवण तालुक्यातील विजबिल थकीत देयक कारवाई यावर चर्चा केली. या समस्यांवर वीज अधिकारी वर्गानेच मार्ग काढायचा आहे, येत्या दिवाळीच्या १५ दिवसात घरात अंधार नको, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या शिष्टमंडळात कुडाळ तालुका निरीक्षक अरविंद मोंडकर, प्रभारी अध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, युवक विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, योगेश्वर कुर्ले, चिन्मय बांदेकर आदि उपस्थित होते. कोरोनामुळे जिल्ह्यातील इतर भागा प्रमाणे कुडाळ – मालवण येथील ही गेली दोन वर्षे लहान मोठे व्यवसाय बंद झाले होते. कोरोना विघ्न संपताच ही पहिलीच दिवाळी आहे जी सामान्य जनतेला गोड जायला हवी, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रस्त्यांवर लाईट नसली, घरातील लाईट बंद झाली त्याबाबत तक्रार दिली तरी चार चार दिवस त्याठिकाणी काम केल जात नाही. मात्र बिल थकीत राहीले की कर्मचारी यादी घेऊन दुसऱ्याच दिवशी दारात उभे राहतात व कोणतीही पूर्व सूचना न देता कनेक्शन तोडतात, अशी तक्रारही यावेळी मांडली. कोरोना काळात आमदनीच बंद झाल्याने लाईट बिल काही प्रमाणात भरायचे राहिल्याने नागरिक आता टप्प्याटप्प्याने ते भरण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील या भागातील रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, पर्यटक देखील कमी प्रमाणात येत आहेत. दुकानात माल पडून राहून खराब झाल्याने व्यावसायिकांना देखील भुर्दंड सहन करावा लागला आहे. यामुळे कधीही थकबाकीदार नसलेला हा जिल्हा सध्या थकबाकी यादीत दिसून येत आहे. वीज कंपनीने देखील पूर्वीचा जमाआलेख पाहता नागरिकांना (ग्राहकांना) सध्यातरी या दिवाळीच्या पंधरा दिवसासाठी काळोखात ठेऊ नये कुणाच्याही घरात काळोख होणार नाही याची जबाबदारी घ्यावी त्यानंतर टप्प्याटप्प्याने बिल भरण्यासाठी नागरिकांना सवलत द्यावी, हवी तर तुम्ही विजबिल थकीत दार यांसाठी लोकअदालत बोलवा त्यात नागरिकांना आपली बाजू मांडू द्या, आम्ही देखील आपल्या सोबत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी येऊन बसू परंतु कोणावरही अन्याय होऊ देऊ नका, अशी मागणी यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
