कणकवली येथील विभागीय कार्यालय मालवणात हलविण्याचा केली मागणी;मालवण सीमाशुल्क अधीक्षक राजेश फुले यांची माहिती
मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग आणि सीमाशुल्क विभागाच्या पुणे व गोव्याच्या मुख्य आयुक्त श्रीमती कृष्णा मिश्रा यांनी आज मालवण येथील सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या कार्यलयाला भेट देत पाहणी केली. यावेळी कणकवली येथे असलेले सीमाशुल्क विभागाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभागीय कार्यालय भविष्याच्या व उपयुक्ततेच्या दृष्टीने मालवण येथे स्थलांतरित करावे अशी मागणी मिश्रा यांच्याकडे केली असून याबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मालवणचे सीमाशुल्क अधीक्षक राजेश फुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग आणि सीमाशुल्क विभागाच्या पुणे व गोव्याच्या मुख्य आयुक्त श्रीमती कृष्णा मिश्रा यांनी आज मालवण येथील सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या कार्यलयाला भेट देत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत पुणे सीमाशुल्क विभाग आयुक्त एस. एम. टाटा, दापोली – रत्नागिरी – सिंधुदुर्ग विभागीय आयुक्त अमित नायक, मालवण सीमाशुल्क अधीक्षक राजेश फुले, अधीक्षक राकेश कुमार मीना आदी व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी सीमाशुल्क विभागातील विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. कणकवली येथे असलेल्या सीमाशुल्क विभागाच्या विभागीय कार्यलयातून कारभार चालविणे गैरसोयीचे ठरत आहे. मालवणला लाभलेला समुद्र, बंदरजेटी व सीमाशुल्क विभागाचे कार्यालय यामुळे याठिकाणाहून सीमाशुल्क विभागाचा कारभार हाकणे सुलभ होणार आहे. मालवण येथे सीमा शुल्क विभागाच्या कार्यालयाची मालमत्ता असून येथील कार्यालयाची दुरुस्ती करून तसेच कस्टमचे कर्मचारी क्वार्टर्स मोडकळीस आले असून त्या जागी पार्किंगची सुविधा निर्माण करता येऊ शकते. तसेच देवगड व रत्नागिरी येथून मालवणात बोटी मागविता येतील. सिंधुदुर्गात चिपी विमानतळ सुरू झाल्याने अमली पदार्थांची वाहतूक वाढू शकते. विमानतळ मालवणला जवळ असल्याने भविष्यात मालवणात अमली पदार्थांचा सुळसुळाट वाढू शकतो त्यामुळे सुरक्षा व कारवाईच्या दृष्टीने मालवणात सीमाशुल्क विभागाचे विभागीय कार्यालय होणे महत्त्वाचे आहे, असे सांगत कणकवली येथील विभागीय कार्यालय मालवण येथे स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी मालवण अधीक्षक राजेश फुले व राकेश कुमार मीना यांनी यावेळी मुख्य आयुक्त मिश्रा यांच्याकडे केली. याबाबत प्रस्ताव सादर करावा, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल असे मिश्रा यांनी सांगितल्याची माहिती अधीक्षक फुले यांनी दिली.
