गुरुवारपर्यंत मदत खात्यात जमा न केल्यास दुकानांच्या चाव्या तहसीलदार कार्यालयात करणार जमा : व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
*⚡बांदा ता.२२-:* बांदा शहरातील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्याने येथील व्यापारी सचिन नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील व्यापाऱ्यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आज धडक दिली. येत्या गुरुवारपर्यंत मदत खात्यात जमा न केल्यास सर्व व्यापारी बांधव आपल्या दुकानांच्या चाव्या तहसीलदार कार्यालयात जमा करून आंदोलन करतील असा इशारा यावेळी नाटेकर यांनी दिला. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी लवकरात लवकर रक्कम खात्यात जमा करण्याचे आश्वासन यावेळी दिले. दिवाळी उत्सव तोंडावर आला असून व्यापाऱ्यांना मदत न मिळाल्यास दुकानात नवीन माल भरण्यासाठी व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. जे व्यापारी भाडेतत्वावर दुकाने घेऊन व्यवसाय करतात त्यांना भाडेकराराची सक्ती न करता वैयक्तिक हमीपत्र देऊन मदत द्यावी अशी मागणी नाटेकर यांनी केली. शहरातील ३८४ व्यापारी हे पूर्ण बाधीत असून येत्या गुरुवारपर्यंत खात्यात मदत जमा न केल्यास पूरग्रस्त व्यापारी आपल्या दुकानांच्या चाव्या तहसीलदार कार्यालयात जमा करून आंदोलन करतील असा इशारा यावेळी नाटेकर यांनी दिला. यावेळी व्यापारी मंगलदास साळगावकर गौरांग शेर्लेकर, गोट्या भोगटे, बाळा पेडणेकर, प्रसन्न पावसकर, राकेश केसरकर ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर यांच्यासह शहरातील बांधव व्यापारी उपस्थित होते. येत्या काही दिवसात रक्कम जमा करण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार म्हात्रे यांनी दिले.
