मालवण नगरपालिकेची २०२१-२२ वर्षाकरिता ११ लाख रुपयांची तरतूद

शहरातील नोंदणी असलेल्या ११४ दिव्यांग व्यक्तींना निधीचे वाटप;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली माहिती

*⚡मालवण ता.२१-:* नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत राखीव ठेवण्यात येणाऱ्या ५ टक्के निधीसाठी मालवण नगरपालिकेने २०२१-२२ या वर्षाकरिता ११ लाख रुपयांची तरतूद केली असून मालवण शहरातील नोंदणी असलेल्या ११४ दिव्यांग व्यक्तींना या निधीचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत ५ टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या निधीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिव्यांगांच्या उदरनिर्वाह, व्यवसाय, साहित्य खरेदी आदींसाठी हा निधी वाटप करण्यात येतो. गतवर्षी मालवण नगरपालिकेने दिव्यांगांकरिता ९ लाख ६० हजार रुपयांची तरतूद केली होती. गतवर्षी मालवण शहरात नोंद असलेल्या ११४ दिव्यांग बांधवांना उदरनिर्वाहासाठी वैयक्तिक अनुदान स्वरूपात या निधीचे वाटप करण्यात आले होते. गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही दिव्यांगांना निधी वाटप करण्याबाबत दि. ७ ऑक्टोबर २०२१ च्या ठरावानुसार नगरपालिकेने मंजुरी दिली होती. या अंतर्गत २०२१ – २२ या आर्थिक वर्षामध्ये दिव्यांग कल्याण निधी करिता मालवण नगरपालिकेने ११ लाख रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील नोंदणीकृत ११४ दिव्यांग बांधवांना या निधीचे वाटप होणार आहे. यामध्ये १०० टक्के ते ८० टक्के दिव्यांग – रुपये १५ हजार – २३ व्यक्ती, ८० टक्के ते ६० टक्के दिव्यांग – रुपये १० हजार – ३० व्यक्ती, ६० टक्के ते ४० टक्के दिव्यांग – रुपये ५ हजार – ६१ व्यक्ती या प्रमाणानुसार हे निधी वाटप होणार आहे. शहरात नव्याने दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांनी प्रमाणपत्रासह नगरपालिकेत प्रशासनाकडे संपर्क साधावा, अशा नवीन दिव्यांग बांधवांनाही निधीचे वाटप करण्यात येईल, असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page