बांदा-दोडामार्ग रस्त्यावर दुचाकीचा अपघात

नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांनी घेतली दखल : अधिकाऱ्यांना बोलावून बुजविला खड्डा

*⚡बांदा ता.१७-:* बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी अपघातग्रस्त होऊन दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली. आज सकाळी घडलेल्या या घटनेनंतर स्थानिकांनी सरपंच अक्रम खान यांचे लक्ष वेधले. त्यांनी तात्काळ याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यानंतर सायंकाळी खड्डा दगड, मातीच्या साहाय्याने बुजविण्यात आला. बांदा-दोडामार्ग रस्त्यावर ठिकठिकाणी भल्यामोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. आज सकाळी डेगवेहून बांद्याच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या दाम्पत्याची दुचाकी गडगेवाडी येथे भल्यामोठ्या खड्ड्यात गेल्याने अपघातग्रस्त होऊन दाम्पत्य जखमी झाले. त्यांच्या मागून प्रवास करणारे येथील उद्योजक सुदन केसरकर यांनी तात्काळ त्यांना मदत केली. रात्रीच्या वेळी अपघात झाल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. यासाठी माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी याची कल्पना सरपंच अक्रम खान यांना दिली. त्यांनी तात्काळ सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह याठिकाणी येत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सुदन केसरकर, प्रसाद सावळ, बाळा आकेरकर, म्हादि गवस, अमित पोकळे, पुखराज पुरोहित आदी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना कल्पना देत तात्काळ खड्डा बुजविण्याची मागणी करण्यात आली. आज सायंकाळी उशिरापर्यंत दगड व मातीच्या साहाय्याने जीवघेणा खड्डा बुजविण्यात आला.

You cannot copy content of this page