कुणाच्यातरी खांद्यावर बंदूक ठेऊन वातावरण खराब करू नका: कन्हैया पारकर

वैभव नाईक हे राज्याचे नेते ; कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याची शिवसैनिकांची तयारी

*⚡कणकवली ता.११-:* महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद वेळी कणकवली पटवर्धन चौकात शिवसैनिकांनी सुरू असलेल्या बेकरीच्या शटरवर लाथा मारल्याचा आरोप करून शहराचे नगराध्यक्ष वातावरण कलुषित करीत आहेत. तसा काही प्रकार झालेला असेल तर संबंधित दुकानदार पोलिसात तक्रार दाखल करील आणि शिवसैनिक पुढील कारवाईला सामोरे जातील, नलावडेंनी दुकानदारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शहरात भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नये. असा इशारा कणकवली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी दिला आहे वैभव नाईक यांनी कुडाळ येथील दुकाने बंद करून दाखवावीत, असे आव्हान नलावडे यांनी दिले आहे. वैभव नाईक हे फक्त कुडाळ – मालवण किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेते नाहीत. ते राज्याचे नेते आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि सद्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे नाईक यांनी कुठे जावे आणि काय करावे, हे सांगण्याचा अधिकार नलावडे यांना नाही. महाविकास आघाडीने पुकारलेला बंद ही जनतेची भावनाच आहे. लखीमपूर येथे शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा चिरडून मारतो. पोलीस त्याला अटक करीत नाहीत. आणि भाजपवाले त्याचे समर्थन करतात, त्याच्या निषेध सुद्धा करीत नाहीत, याची भाजपच्या स्थानिक नेत्यांना लाज वाटली पाहिजे. सध्या देशभरात वाढलेली महागाई, पेट्रोलचे रोज वाढणारे भाव, गॅसची असह्य दरवाढ, बेबंद खासगीकरण यांच्याविरोधात हा बंद आहे. त्याला जनतेने राज्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ती लोकभावना नलावडे आणि भाजपच्या सर्वच नेत्यांनी लक्षात घ्यावी. कुणाचा तरी आधार घेऊन शहरातील वातावरण खराब करू नये. कोणत्याही कारवाईस सामोरे जाण्यास आम्ही समर्थ आहोत.असे कणकवली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page