ऐन नवरात्रोत्सवात मडुरा, आरोस पंचक्रोशीत वारंवार वीज गूल

भाविक आक्रमक

*⚡बांदा ता.११-:* ऐन नवरात्रोत्सवात विजेचा लपंडाव सुरू झाल्याने भाविकांच्या आनंदावर काळोख आला आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रात्री थोडाफार लपंडाव चालू होता परंतु चौथ्या रात्री तर गेलेली वीज दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आलीच नव्हती. जर उर्वरित नऊ दिवस वीजपुरवठा सुरळीत न केल्यास आम्ही आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा, आरोस व मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांनी दिला आहे. भरमसाठ वीज बिले माथी मारून ऐन नवरात्रोत्सवातच वीज गुल होण्याचे प्रकार गेले चार दिवस सुरू आहेत. नऊ दिवस तरी निदान नवदुर्गा मातेच्या उत्सवात विजेचा काळोख येता कामा नये यासाठी बांदा कनिष्ठ सहाय्यक अभियंता यांचे वारंवार लक्ष वेधले होते. परंतु नेहमीप्रमाणे पाऊस, गडगडाट अशी कारणे पुढे ढकलत विजेचा लपंडाव मात्र काही केल्या सुरूच आहे. नऊ दिवसांतील उर्वरित दिवस जर वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपा सातार्डा शक्ती केंद्रप्रमुख यशवंत ऊर्फ तात्या माधव यांनी दिला आहे. मडुरा पंचक्रोशीतील चार ते पाच गावांना कायमस्वरुपी वायरमन नसतानाही ग्रामस्थांनी वीज वितरणला अनेक प्रकारे सहकार्य केले. परंतु नवरात्रोत्सवात वीज गुल होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे केलेल्या सहकार्याची जाणीव वीज वितरण अधिकाऱ्यांना नाही का असा सवालही संतप्त भाविकांमधून केला जात आहे. वीज वितरणवर कुठेही नैसर्गिक आपत्ती ओढावली असेल तर आम्ही सहकार्य करू परंतु आमच्या उत्सवादरम्यान वीजपुरवठा खंडित करू नका, अशी मागणी आरोस, मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.

You cannot copy content of this page