*⚡कणकवली ता.१०-:* ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ या संत वचनाप्रमाणे उभे आयुष्य ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय व दशावतारी राजा कै. बाबी नालंग यांच्यासोबत दशावतारी नाट्य मंडळातून कीर्तन परंपरा व दशावतारी कला जिवंत ठेवण्यासाठी देह चंदनाप्रमाणे झिजवला असे ह.भ.प. कै. पुरूषोत्तम अनंत परब उर्फ दाजी परब यांचा प्रथम स्मृतीदिन सोमवार 11 ऑक्टोबर रोजी आंब्रड येथे त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. तरूणाईची काही वर्षे मुंबईला नोकरी करत असताना नोकरीत त्यांचे मन रमले नाही. गुरूतुल्य पवारबुवा यांच्या सान्निध्यात भजनाच्या नादब्रम्हामध्ये त्यांनी वाटचाल सुरू केली. मायभूमी आंब्रडला येवून त्यांनी विठ्ठल प्रासादिक भजन मंडळाच्या माध्यमातून हार्मोनियम भजनीबुवा म्हणून 35 वर्षे सेवा केली. दशावतारी कला दिल्लीपर्यंत पोहोचविणारे दशावतार सम्राट, लोकप्रिय राजा कै. बाबी नालंग यांच्यासोबत त्यांनी उत्तम हार्मोनियमची साथ गावोगावी होणार्या जत्रोत्सवातून दिली. त्यावेळी ‘रात्रीचो राजा आणि दिवसाचो डोक्यार बोजा’ अशी बिकट परिस्थिती दशावतारांची होती. गॅसबत्तीच्या मंद प्रकाशात दाजींनी आपल्या नादमधुर सुरांनी रंगत भरली. शासन दरबारी याची नोंद घेवून त्यांना अनेक पुरस्कार व मानधन देवून गौरविण्यात आले होते. पुण्यश्लोक वामन लाडोजी परब यांच्या परंपरागत वारकरी कुटुंबाचा वारसा हभप तात्या महाराज, ह. भ.प. दादा महाराज, ह.भ.प. अण्णा महाराज परब यांच्यासोबत वयाच्या 98 वर्षापर्यंत त्यांनी सुरू ठेवला.
दशावतार हार्मोनियमसम्राट पुरूषोत्तम परब यांची सोमवारी पुण्यतिथी
