भाजप महिला शहर अध्यक्षा सौ मडगावकर म्हणजे सर्वसामावेश नेतृत्व
*⚡सावंतवाडी ता.०८-:* सावंतवाडीच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने नव्याने ठसा उमटवत असणारी स्त्री शक्ती म्हणजेच भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर.राजकारणातील एक आघाडीचे महिला नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मांतोंड सारख्या ग्रामीण भागात एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई वडील दोघेही ग्रामपंचायत सदस्य असल्याने राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. तळवडे हायस्कूल येथून १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पंचंम खेमराज महाविद्यालय मधून त्यानी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. तसेच संगणक कोर्स देखील त्यांनी पूर्ण केला. सावंतवाडी येथील सुरेंद्र मडगावकर यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळताना त्यानी राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सासरी आणि माहेरी काँग्रेस पक्षाची विचारधारा असल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम सुरू केले. घरातील सर्व सदस्यांची खंबीर साथ असल्याने त्यांना राजकारण अडचणींचा सामना करावा लागला नाही. राजकारणात जेवढ्या त्या अग्रेसर आहेत. तेवढ्याच त्या समाजकारणात देखील अग्रेसर असतात. शहरातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात. कोरोना सारख्या कठीण काळात देखील त्यानी पुढे येऊन अनेकांना सहकार्य केले. चार वर्षांपूर्वी शहरातील अनेक महिलांना एकत्र आणून त्यांनी घे भरारी फाऊंडेशनची स्थापना करून त्यांनी महिलांसाठी काम सुरू केले. शहरातील अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक संस्थांवर त्या आज स्वतः ला झोकून देऊन काम करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विकासाचा दृष्टीकोन आणि काम करण्याची पद्धत त्यांना भावल्याने त्यानी त्यांच्यासह स्वाभिमान पक्षात आणि त्यानंतर भाजप मध्ये प्रवेश केला. महिलांना एकत्र करून त्या करत असलेले काम पाहून भाजप महिला शहर अध्यक्षा म्हणून त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली. आणि ती जबाबदारी त्या लील्या पार पाडत आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजना त्या घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांनी वेंगुर्ला येथील डॉ. वसुधा योगा अँड फिटनेस अकॅडमी मधून योग शिक्षणाचे धडे घेतले असून, योग शिक्षिका ही पदवी देखील प्राप्त केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावागावात जात त्या महिलांनी फिट रहावे यासाठी योग शिक्षण देऊन, योगाचे महत्त्व त्यांना पटवून देत आहेत. राजकारणासह समाजकारणात त्या करत असलेले कार्य उल्लेखनीय असून, राजकारणातील या स्त्री शक्तीला ग्लोबल महाराष्ट्र कडून प्रणाम…
