केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेचा पुरेपूर लाभ घ्या…

उपसभापती अरविंद रावराणे यांचे आवाहन

वैभववाडी प्रतिनिधी समाजातील शेवटच्या घटकाला या आयुष्यमान योजनेचा लाभ होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने या योजनेची जनजागृती व नोंदणी होत आहे. लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपले हक्काचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे आता जनतेला चांगले दिवस येणार हे निश्चित आहे. केंद्र शासनाच्या या योजनांचा पुरेपूर लाभ घ्या, असे आवाहन उपसभापती अरविंद रावराणे केले. आयुष्यमान भारत योजना नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ येथील पंचायत समिती सभागृहात पार पडला. यावेळी सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती शारदा कांबळे, हर्षदा हरयाण, सहाय्यक गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, पथकातील प्रमुख व योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीएससी चे प्रतिनिधी दीपक पवार, श्रीकांत दोंदले, महादेव शिराळकर यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. अक्षता डाफळे, हर्षद हरयाण, शारदा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील 8991 इतक्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पाच लाख रुपयांपर्यंतच्या 1350 आजारावर मोफत उपचार या योजनेअंतर्गत केले जाणार आहेत. त्यासाठी आपल्याकडे आरोग्य कार्ड असणे फार गरजेचे आहे. नोंदणी झाल्यानंतरच या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. नोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, रेशन कार्ड व प्रधानमंत्री कार्यालयाकडून आलेल्या लिस्ट मध्ये नाव असणे आवश्यक आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. उपस्थित लाभार्थ्यांनी आमदार नितेश राणे व पंचायत समिती पदाधिकारी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष टक्के यांनी केले.

You cannot copy content of this page