आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत ग्वाही
वैभववाडी प्रतिनिधी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. ज्या लाभार्थ्यांची यादीत नावे नाहीत त्यांनी अजिबात नाराज होऊ नये. केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणेसाहेब यांच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित नागरिकांना यादीत समावेश करण्याच्या दृष्टीने स्वतः मी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिले. वैभववाडी येथे आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने आयुष्यमान भारत योजना नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, राजेंद्र राणे, प्राची तावडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितेश राणे म्हणाले, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी भारताच्या सर्व नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून आरोग्य कवच उपलब्ध करून दिले आहे. आयुष्यमान भारत योजना नोंदणी कार्यक्रम शुभारंभ मतदारसंघातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तीनही तालुक्यात मंगळवारी पार पडला. 5 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मतदारसंघातील 47 हजार लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. नोंदणी झालेल्या प्रत्येक लाभार्थ्याला आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य सेवा मिळणार आहे. सेवा देण्यात येणाऱ्या दवाखान्याची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. तसेच लाभार्थी यादीही जाहीर करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या यादीतील लाभार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे. हा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातील यादीत ज्या लाभार्थ्यांची नावे नाहीत त्या लाभार्थ्यांची नावे दुसऱ्या टप्प्यातील यादीत समावेश होण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे असे सांगितले. या योजनेत कोणावरही अन्याय होणार नाही. शंभर टक्के मतदार संघातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यास तुमचा हक्काचा आमदार कटिबद्ध आहे. पुढील काळात उर्वरित लाभार्थ्यांची नावे यादीत दिसतील असा विश्वास आमदार श्री. राणे यांनी व्यक्त केला. वैभववाडीत आज शंभर लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. आम्ही कार्यरत केलेली सीएससी टीम महिनाभर वैभववाडीत थांबणार आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. चौकट या योजनेच्या जनजागृतीसाठी वैभववाडी भाजपची संपूर्ण टीम काम करत आहे. भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्या नेतृत्वाखाली गावागावात या योजनेबाबत जनजागृतीसाठी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती या अभियानात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी देणार आहेत. तसेच नोंदणी कक्षा पर्यंत लाभार्थ्यांना पोचण्यासाठी ही टीम मेहनत घेणार आहेत असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. फोटो – आ. नितेश राणे
