पोलिसांची माहिती; अटक करण्यात आलेल्या ४८ कामगारांना जामीन मंजूर
मालवण दि प्रतिनिधी देवबाग येथील कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत देवबाग ग्रामस्थानी काल वाळू माफियांना दणका दिल्यानंतर पोलीसानी याप्रकरणी ५१ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४८ कामगारांना काल रात्री उशिरा मालवण न्यायालयात हजर केल्यानंतर या सर्वांची वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे तर त्या तीन बोट मालकांचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती मालवण पोलिसांनी दिली आहे. देवबाग येथे कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर काल पहाटे देवबाग ग्रामस्थानी चाल करत वाळू उत्खनन करणाऱ्या बोटींना घेरत पकडले होते. याची माहिती महसूल विभागाला मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थानी पकडलेल्या बोटी व वाळू तसेच साहित्य जप्त करत कामगारांना पोलिसांच्या हवाली केले होते. याबाबत मालवण मंडळ अधिकारी पीटर लोबो यांनी अनधिकृत वाळू उपसा व शासकीय मालमत्तेची चोरी प्रकरणी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर काल रात्री उशिरा बोट मालक सागर परब (कुडाळ), मुकेश नामदेव सारंग (कोरजाई), लीलाधर जगदीश खोत (कोरजाई) या तिघांसह ४८ कामगार अशा एकूण ५१ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्या ४८ कामगारांची कोरोना टेस्ट तसेच वैद्यकीय तपासणी केल्यानंतर काल रात्री उशिरा त्यांना मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकी रु. ७५०० च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल केलेल्या तिन्ही बोट मालकांना अद्याप अटक करण्यात आलेली नसून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण हे करत आहेत.
