वैभववाडी प्रतिनिधी नावळे राणेवाडी येथील कोसळलेल्या साकवाची पहाणी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केली. जिल्हा नियोजन मधून लवकरच या ठिकाणी नवीन पूल मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन संजना सावंत यांनी ग्रामस्थांना दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जि.प.बांधकाम उपअभियंता सुतार, ग्रामपंचायत सदस्य महेश रावराणे, प्राची तावडे, ग्रामसेवक अनिल घुगे आदी उपस्थित होते. नावळे राणेवाडी येथील हा लोखंडी साकव पंधरा दिवसापूर्वी कोसळला होता. या अपघातात साकवावरुन जाणाऱ्या दोन गाई नदीत पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. तर अन्य गुरांनाही किरकोळ दुखापत झाली होती. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर अध्यक्षा सावंत यांनी नुकतीच नावळे येथे येऊन या साकवाची पहाणी केली आहे. नावळे राणेवाडी येथील हा साकव शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी महत्वाचा साकव होता. या साकवावरुन ग्रामस्थांसह गुरेही ये जा करीत असतात. माञ तो साकव कोसळल्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
नावळे राणेवाडीतील कोसळलेल्या साकवाची संजना सावंत यांनी केली पाहणी
