*⚡मालवण ता.०१-:* सांगली जिल्ह्यातील तासगावचे रहिवासी विक्रम विश्रांत यादव यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत जगातील अत्यंत दुर्मिळ अशा बाँबे ब्लड ग्रुप रक्ताचे रक्तदान करत सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत रक्ताचे नाते जोडले आहे. मालवण तालुक्यातील नांदोस येथिल श्री. राजाराम गोविंद गावडे (वय ६५ वर्षे) यांचे एचबी ४ ग्रॅम होते. तसेच त्यांचे डायलेसीसही चालू आहे. त्याकरिता त्यांना जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या बाँबे ब्लड ग्रुपच्या ४ सदस्यांपैकी एक सुधीर कांबळी यांनी रक्तदान केले होते. रुग्णाला आणखी एका रक्तबॅगची आवश्यकता होती. त्या करिता जिल्ह्यातील अन्य ३ रक्तदाते तब्येतीच्या कारणाने रक्त देऊ शकत नव्हते. त्यामुळे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सांगली तासगावचे मित्र दुर्मिळ रक्तदाते श्री. विक्रम यादव हे स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले व त्यांनी अत्यंत अमूल्य असे रक्तदान केले. विक्रम यादव यांचे हे तब्बल ६६ वे रक्तदान आहे. यापूर्वी त्यांनी रांची, उत्तराखंड, झारखंड, विशाखापट्टणम, आग्रा, विजापूर, बेंगलोर, म्हैसूर, रत्नागिरी, कर्नाटकसह दुबई, पाकिस्तान, बांग्लादेश इत्यादी ९ देशात रक्तदान केले आहे. विक्रम यादव आपल्या कुटुंबासह सिंधुदुर्गनगरीत दाखल झाल्यावर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ, सचिव श्री किशोर नाचणोलकर, यांसह बॉम्बे ब्लड ग्रुप असलेले पंकज गावडे, सुधीर कांबळी, सपना पडवळ आदींनी त्यांचे स्वागत केले. विक्रम यादव यांच्या या रुग्णसेवेबद्दल सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव घुर्ये व डॉ. यादव यांनी पुष्पगुच्छ व शाल घालून त्यांचा सपत्निक सत्कार केला. यावेळी विक्रम यांचे आई वडिलही उपस्थित होते.
सांगलीच्या रक्तदात्याने सिंधुदुर्गात केले बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदान
