शिक्षणप्रेमी ग्रामस्थांच्या सभेत प्रा .महेंद्र नाटेकर यांचा शासनावर आरोप
*⚡कणकवली ता.२२-:* शाळा – महाविद्यालये सुरू करायची झाली तर बहुसंख्य शिक्षकांच्या तात्काळ नेमणुका कराव्या लागतील . कोविड सेंटरवर पाठविलेल्या शिक्षकांना परत शाळेत बोलवावे लागेल व त्यांच्याऐवजी अन्य हजारो तरुणांच्या नेमणुका कराव्या लागतील . याला प्रचंड खर्च येणार आहे . म्हणून केवळ आर्थिक बचतीसाठी शासनाने कोरोनाची भीती दाखवून शाळा – महाविद्यालये सुरू केली नाहीत . आज विद्यार्थी , पालक , शिक्षक , मुख्याध्यापक शाळा – महाविद्यालये सुरू करण्याचा आग्रह धरून मोर्चे काढीत आहेत , तरीही शासन त्याची कार्यवाही करीत नाही . यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ होऊन राज्य उद्ध्वस्त होत आहे अशी घणाघाती टिका प्रा . महेंद्र नाटेकर यांनी केली . शिक्षणप्रेमी ग्रामस्थांची सभा ग्रामस्थ , पालक , शिक्षक यांची बैठक आयोजित केली होती . त्यावेळी प्रा . महेंद्र नाटेकर बोलत होते . यावेळी विश्वनाथ केरकर , अनंत कदम , प्रा . पी . बी . पाटील , जे . जे . दळवी , अशोक राणे इत्यादी उपस्थित होते . प्रा . नाटेकर पुढे म्हणाले , शाळा – महाविद्यालय सुरू करण्यासाठी नियमानुसार सुमारे चाळीस हजार प्राथमिक शिक्षक , पंचवीस हजार माध्यमिक शिक्षक व अठरा हजार प्राध्यापक यांच्या नेमणुका करणे आवश्यक आहे . परंतु मुळातच असलेले शिक्षक ठिकठिकाणी महाराष्ट्रभर कोविड सेंटरवरील व्यवस्थापन सांभाळत आहेत . काही शैक्षणिक संस्थांमध्ये कोव्हिड सेंटर आहेत . शाळा महाविद्यालये सुरू करायची झाली तर बहुसंख्य शिक्षकांच्या तात्काळ नेमणुका कराव्या लागतील . कोव्हिड सेंटरवरील व्यवस्थापन सांभाळत आहेत . काही शैक्षणिक संस्थांमध्ये कोविड सेंटर्स आहेत . शाळा बंद निर्णयामुळे ग्रामीण भागातील ३७ % तर शहरी भागात २४ % विद्यार्थ्यांनी ग्रामीण शिक्षणाला रामराम ठोकला आहे . ऑनलाईन शिक्षण पध्दतीने शिक्षक विद्यार्थी भेट होत नसल्याने विषय समजून घेण्यात आले नाहीत . शाळा बंद असल्याने मध्यान्ह भोजनास विद्यार्थी मुकले आहेत . त्यामळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाले आहेत . चालू वर्षी पन्नास हजाराहून विद्यार्थ्यांनी शाळा – महाविद्यालयात प्रवेश घेणे नाकारले आहे . शाळेत जाणे म्हणजे केवळ अभ्यास करणे एवढेच नसते . त्याचा मुलांच्या सामाजिक विकासावरही मोठा परिणाम होत असतो . विद्यार्थी मित्रांशी संवाद साधून गप्पाटप्पा मारणे , विचाराची देवाण – घेवाण करणे यातूनही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होतो . वरील सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जगातील अनेक देशांनी अनंत अडचणींना तोंड देत शाळा – महाविद्यालये सुरू ठेवली तर आपला देश आणि विशेषतः आपले राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती दाखवत शाळा महाविद्यालये बंद ठेवून आर्थिक बचत करत आहे , ही राज्याला लाजिरवाणी गोष्ट आहे . शिक्षणप्रेमी , शिक्षणतज्ञ पालकांच्या आग्रहानुसार आरोग्याची दक्षता घेत शाळा – महाविद्यालये शासनाने त्वरीत सुरू करावीत , अन्यथा पुढील अनेक पिढ्या राज्यकर्त्यांना माफ करणार नाहीत , असे शेवटी प्रा , महेंद्र नाटेकर म्हणाले .
