कणकवली 17 सप्टेंबर (प्रतिनिधी)- मुंबई विद्यापिठाची मुंबई , ठाणे , रत्नागिरी येथे उपकेंद्र आहेत . पण त्यांचा शैक्षणिक विकास गतिमान झाल्याचे दिसत नाही . उलट रत्नागिरी येथील उपकेंद्रात बोगस डिगऱ्या विकून भ्रष्टाचार फोफावल्याचे वृत्त वृत्तपत्रातून प्रसिध्द झाले होते . मुळातच भोंगळ कारभारामुळे मुंबई विद्यापिठाचा शैक्षणिक दर्जा खालावलेला असताना राज्यपाल उद्घाटन समयी म्हणतात त्याप्रमाणे शिक्षणाचे नवीन मॉडेल कसे बनणार ? आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ? असे परखड मत शिक्षणतज्ञ प्रा . महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केले . स्वतंत्र कोकण विद्यापीठ कोकण विद्यापीठ कार्यकारिणीची बैठक सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केली होती . त्यावेली प्रा.नाटेकर बोलत होते . प्रा . नाटेकर पुढे म्हणाले , विदर्भ , मराठवाड्यामध्ये प्रत्येकी दोन विद्यापिठे आहेत . प. महाराष्ट्रामध्ये पुणे , जळगाव , कोल्हापूर , सोलापूर येथे चार विद्यापिठे आहेत . परंतु कोकणात एकही विद्यापीठ नाही . मुंबई येथे जे विद्यापीठ आहे ते भारतीय विद्यापीठ बनले आहे . तेथे प्रचंड गर्दी असते . तेथे विद्यापिठीय कामासाठी ५००/५०० किलो मीटर्स अंतरावर ये जा करावी लागते . गर्दीमुळे अनेक तास विद्यार्थी संस्थाचालक , प्राध्यापक , प्राचार्यांना रांगेत उभे राहावे लागते . ह्या विद्यापिठातून आठ लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत . त्यामुळे प्रशासन कोसळले आहे . शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे . परीक्षा वेळच्या वेळी घेऊन योग्वेळी निकाल लावले जात नाहीत . मूल्यमापन घिसाडघाईने केले जाते . पासाचे नापास व नापासाचे पास असा विदारक अनुभव विद्यार्थ्यांना येतो . आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलने करावी लागतात . गुणानुक्रमे जगातील दोनशे विद्यापिठात मुंबई विद्यापिठाचा नंबर नाही , एवढेच नव्हे तर भारतातील गुणानुक्रमे पहिल्या शंभर विद्यापिठातही मुंबई विद्यापिठाला स्थान नाही . अशा स्थितीत मुंबई विद्यापिठाचे सावंतवाडी येथील उपकेंद्र राज्यपाल म्हणतात त्याप्रमाणे शिक्षणाचे नवीन मॉडेल बनणे केवळ अशक्य आहे . अर्थात ते राज्यपाल कोश्यारी यांचे राजकीय भाषण होते . ते शब्दशः घ्यायचे नसते हेच खरे . मुंबई विद्यापिठाचे कुलगुरू प्राचार्य पेडणेकर यांनी सावंतवाडी येथे उपकेंद्र सुरू केले आहे . त्या ठिकाणी लवकरच विद्यापीठ होईल असे घोषित केले आहे . पण हे सुध्दा अवास्तव आहे . स्वतंत्र कोकण विद्यापीठ कोकणाच्या मध्यवर्ती ठिकाणी रत्नागिरीलाच होणार आहे . तशी आमची मागणीही आहे . मुंबई विद्यापिठाचा धासळता शैक्षणिक दर्जा लक्षात घेऊन आम्ही सिंधुदुर्ग , रत्नागिरी , रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये प्राध्यापक , प्राचार्य आणि विद्यार्थी यांच्या सहविचार सभा घेतल्या . ह्या सभांमधून मुंबई विद्यापिठाचा ढासळता दर्जा , दूरचे अंतर व विद्यापिठातील सुमारे आठ लाख विद्यार्थी आणि कोसळते प्रशासन लक्षात घेऊन कोकणी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी रत्नागिरी येथे मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र कोकण विद्यापिठाची मागणी केली . त्यानुसार मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री यांच्याकडे अर्ज केले . विधानसभा विधान परिषदेमध्ये त्यावर सकारात्मक चर्चा झाली . माजी शिक्षणमंत्री तावडे यांनी आपण ह्या विषयावर सकारात्मक असल्याचे घोषित केले .
कोकणी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठच झाले पाहिजे :प्रा.नाटेकर
