बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ शाखा सिंधुदुर्गतर्फे एकनाथ आंबोकर यांचा सन्मान

*⚡कणकवली ता.०९-:* सिंधुदुर्ग जि. प.चे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची बदली झाल्यामुळे बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने एकनाथ आंबोकर यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. १५ जून २०१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बदली होऊन आलेले एकनाथ आंबोकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गेली तीन वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून फार मोठे योगदान दिलेले आहे. यामध्ये सन १९९७/१९९८ साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये सुरू झालेल्या वैशिष्टपूर्ण अश्या बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात एकनाथ आंबोकर यांनी नाविन्यपूर्ण केलेले बदल आहेत. यामध्ये लंगडी या खेळ प्रकाराचा नव्याने केलेला अंतर्भाव आहे. कबड्डी मधील वजनी गटाचा समावेश आहे. समूहगान करिता वाद्यवृंद म्हणून विद्यार्थ्यांना दिली गेलेली संधी आहे. समूह नृत्यामध्ये थीम नृत्य प्रकाराचा केलेला समावेश आहे. प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंसाठी निश्चित केलेल्या वेगवेगळ्या रंगाचा ड्रेस कोड आहे. स्क्रीनवर डिजीटल पध्दतीने घेतली जाणारी प्रश्नमंजुषा आहे. क्रीडा महोत्सवा पूर्वी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना दिलेली क्रीडा प्रशिक्षणं आहेत. तसेच इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीची डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षा आहे. तसेच यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना विमानाने घडवून आणलेली इस्रो सहल आहे. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांना निसर्गाशी एकरूप करताना बांधावरची शाळा आणि सेंद्रिय परसबाग स्पर्धा असे बळीराजाला पुनर्जीवित करणारे उपक्रम आहेत. तसेच तंबाखू मुक्त शाळा अभियान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना स्वलिखित पुस्तके लिहिण्याबाबत एकनाथ आंबोकर यांनी दिलेली प्रेरणा आहे. अशा आणि इतर सर्व स्तुत्य कार्यकर्तृत्वाबद्दल एकनाथ आंबोकर यांचा संघटनेच्यावतीने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनायक हरकुळकर, मार्गदर्शक दत्ता गायकवाड उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांची फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

You cannot copy content of this page