महामारी रोखण्यासाठी स्वतःपासूनच काळजी घ्यायला हवी:मनोहर पालयेकर

प्रवासी संघाच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे

*⚡कणकवली ता.०१-:* गणेशोत्सव सण म्हणजे कोकणी बांधवांचा उत्सव आहे. मात्र, गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमुळे हा उत्सव साजरा करताना निर्बंध आले आहेत. कोरोना महामारी संपवयाची असेल तर कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेईलच. पण प्रत्येकानेही महामारी रोखण्यासाठी यंदाही स्वतःपासूनच काळजी घ्यायला हवी. गणपती बाप्पा याही महामारीतून आपणास निश्‍चित बाहेर काढेल, असे प्रतिपादन तालुका प्रवाशी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांनी केले. दरम्यान, प्रवासी संघाच्या उपाध्यक्षपदी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे यांची निवड करण्यात आली होती. कणकवली तालुका प्रवासी संघाची बैठक नुकतीच न.पं.च्या बहुउद्देशीय हॉलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात पार पडली. या बैठकील दादा कुडतरकर, राजाराम परब, रवींद्र मुसळे, योगेश मुंज, विनायक धालवलकर, श्रद्धा कदम, वृषाली जाधव, प्रा. पांडुरंग पाटील, सुरेश पाटकर आदी उपस्थित होते. गौरी-गणपतीच्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी येणार आहेत. कणकवली तालुका प्रवासी संघाच्यावतीने कोरोना महामारी रोखण्यासाठी, वाहतूक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी, गर्दीवर नियंत्रण, आरोग्य तपासणी, दिवा पॅसेजर सुरू करण्याबाबत सविस्तर निवेदन संबंधितांना अधिकार्‍यांना देण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. यंदा कोरोनाचे शासनाचे असलेले निर्बंध लक्षात घेऊन चाकरमान्यांचे स्वागत कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात येणार्‍या चाकरमान्यांनी गौरी-गणपती उत्सव साजरा करताना स्वतःची काळजी, कुटुंबाची व गावाची काळजी घेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन प्रवासी संघातर्फे करण्यात आले. तर सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असणार्‍या तालुका प्रवासी संघामध्ये क्रियाशील कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीत विविध विषयांच्या चर्चेवर उपस्थितांनी सहभाग घेतला. आभार श्रद्धा कदम यांनी मानले.

You cannot copy content of this page