*⚡कणकवली ता.०१-:* भाजपने तरुणांना कोट्यावधी नोकऱ्या उपलब्ध करुन देणार या सारख्या आश्वासनांनी २०१४ ची लोकसभा जिंकली. हिंदुत्वाच्या नावाखाली २०१९ ची लोकसभा जिंकली. मात्र गेल्या सात वर्षांत नोकर्यांच्या नावाने बोंबच आहे. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचे धोरण अवलंबून आहे तो रोजगार बुडविण्याचे काम सुरू केले आहे. भाजप या पक्षातील नेतेमंडळी व्यापारी व्रुतीची आहेत. त्यांना सार्वजनिक तथा सहकार क्षेत्र चालविण्याचा अनुभव नाही. पर्यायाने त्यांचा कल मुक्त अर्थ व्यवस्थेकडे आहे. त्यामुळे देशाचे भवितव्य अंधारमय झाले आहे. तरुणांनी आता या अन्यायाविरुद्ध संघटितपणे आंदोलने उभी केली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. या पत्रकात त्यांनी आपल्या देशातील सार्वजनिक, निमशासकीय बहुसंख्य कंपन्या देशप्रेमी प्रशासनामुळे एकेकाळी फायद्यात चालू होत्या. मात्र हळूहळू या कंपन्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढू लागला. मर्जीतील नोकरशहांच्या हाती या कंपन्या सोपविण्यात आल्यात. भ्रष्टाचार आणि पक्षनिधीच्या करोडो रुपयांच्या देणग्यांमुळे या कंपन्या डबघाईस आणण्यात आल्यात, अशी माहिती देऊन केळुसकर म्हणतात, आज देशातील काही मोठ मोठे खाजगी उद्योगही तोट्यात चालत आहेत. या उद्योजकांनी लाखो करोडो रुपयांची बँकांची कर्जे बुडविली आहेत. अंबानी सारख्या अनेक उद्योजकांनी सरकारची करोडो रुपयांची देणी ठकविली आहेत. मात्र या कंपन्यांनी भाजपसह अन्य पक्षांना दिलेल्या करोडो रुपयांच्या देणग्यांमुळे पक्ष नेते मिंधे झाले आहेत. सार्वजनिक, निमशासकीय क्षेत्रातील कंपन्या राष्ट्रप्रेमी नोकरशहांच्या हाती सोपविल्या तर आजही त्यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली त्या फायद्यात येतील. मात्र त्यामुळे पक्ष चालविणे कठीण होईल अशी भीती नेत्तुत्वाला वाटते. त्यापेक्षा मुक्त अर्थव्यवस्थेचे गोडवे गाणे सोयीचे या व्रुतीने धोरणे आखली जात आहेत. अशा धोरणामुळे आजच्या तरुण पिढीला कायम स्वरुपी नोकर्यांना मुकावे लागणार आहे. केंद्र आणि राज्य शासनांमध्ये लाखोच्या संख्येने पदे रिक्त आहेत. मात्र कायम स्वरूपी नोकर भरती ऐवजी ठेकेदारी पद्धतीने नोकर भरती केली जात आहे. पर्यायाने तरुण वर्गांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. शैक्षणिक क्षेत्राचे खाजगीकरण केले जात आहे. गरीब वर्ग अशिक्षित राहिल्यास हरकाम्या उपलब्ध होतील या हेतूने धोरणे राबविली जात आहेत,असे स्पष्ट करून ते म्हणतात या अन्यायाविरुद्ध आता तरुणांनी संघटितरित्या पेटून ऊठून आंदोलने उभारली पाहिजेत. तरच आपण देशातील हे अराजक थांबवू शकू.
भवितव्य अंधारमय असल्याने तरुणांनी आंदोलने उभी करावीत: मोहन केळुसकर
