गोपाळकाल्यानिमित्त बाळ गोपाळानी उत्सवाचा लुटला आनंद
*⚡कणकवली ता.३१-:* दीड वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांतच सण व उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. यंदाही दहीहंडी उत्सव कणकवली शहरात साधेपणाने व परंपरा जपत साजरा करण्यात आला. गोकुळ अष्टमी व गोपाळकालानिमित्त शहरात घरोघरी ठिकठिकाणी गोकुळाष्टमीचे मांड मांडण्यात आले होते. आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी या मांडाचे पूजाअर्चा करून आरती करण्यात आली, तर गोपाळकाल्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. सकाळपासून शहरात पावसाची रिमझिम होती. पाऊस असल्याने बाळ गोपाळानी उत्सवाचा आनंद लुटत परंपरेनुसार हा सण साजरा केला. बाजारापेठेत महापुरुष गणेश मंदिर, आंबेआळी, संदेश पारकर घरासमोर, ढालकाठी, पटकीदेवी व काशीविश्वेश्वर मंदिरात हंडी बांधून त्या फोडण्यात आल्या. त्यानंतर कृष्णांच्या मूर्तीचे गणपती साना येथील जनावली नदीत विसर्जन करण्यात आले.
