मनुष्यहानी झाल्यास गुन्हा दाखल करणार; मनीष सातार्डेकर यांचा इशारा
*⚡वेंगुर्ला ता.३१-:* वेंगुर्ला-कुडाळ रस्ता खड्डेमय झाला असून ‘रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता‘ हेच कळेनासे झाले आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा वाहनचालक व पादचा-यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदरच्या रस्त्यावर केवळ मलमपट्टी न करता ते डांबर व खडी घालून बुजवावेत. अन्यथा या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवित हानी झाल्यास संबंधित प्रशासकीय अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर असलेले खड्डे चुकविण्याच्या नादात छोठे-मोठे अपघातही घडतात. या खड्ड्यांत माती टाकूनही पावसात गाड्या स्लिप होतात. हे सर्व माहित असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. याठिकाणी मोठा अपघात होऊन जीव गमवावा लागल्यास याला केवळ प्रशासन व प्रशासनाचे संबंधित अधिकारी हेच जबाबदार असतील असा इशाराही अॅड.सातार्डेकर यांनी दिला आहे.
