मालवण नगरपालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने निवेदन सादर
*⚡मालवण ता.३१-:* अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करताना ठाणे महानगरपालिकेच्या उप आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका परप्रांतीय व्यवसायिकाने धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. “अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध असो… कर्मचारी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा देत यावेळी कर्मचाऱ्यांनी या प्रकरणातील अटक असलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन मालवण नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे ठाणे महानगरपालिकेच्या उप आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर जमत घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कोकरे, उपाध्यक्ष सुधाकर पाटकर, सचिव सचिन कासले, अधिकारी जयसिंग गावित, प्रथमेश कसालकर, गीतांजली नाईक, विजय रावले, कर्मचारी आनंद म्हापणकर, महेश परब, हेमंत आचरेकर, बस्त्याव फर्नांडिस,, विश्राम जाधव, राजा केरीपाळे, सुनील चव्हाण, विनायक खरे, वीणा पारधी, लुबना खान, वैभवी तांडेल आदी उपस्थित होते. प्रशासनास दिलेल्या निवेदनात एका महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. शासनाचे कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठीचे बदल्यांचे चक्राकार धोरण, पती-पत्नी एकत्रीकरणाला नविन धोरणात दिलेला फाटा व अशा प्रकारे होणारे जीवघेणे हल्ले यामुळे महिला अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल ? याचा सुध्दा गांभिर्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने या गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करत आहोत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावत असताना अधिकाऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे .
