आरोग्य अधिकारी विश्वासात घेत नाहीत

आरोग्य समिती सभेत सभापतींची नाराजी

ओरोस-:जिल्हा परिषद आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी झालेल्या आरोग्य समितीच्या सभेचा अजेंठा आपल्याला न दाखविता आरोग्य अधिकारी यांनी काढला असल्याचा आरोप सभापती डॉ सौ दळवी यांनी केला. त्यामुळे सदस्य सुद्धा अवाक झाले. यामुळे तुमच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत असून यापुढे सभेचा अजेंठा काढण्यापूर्वी सभापतींना दाखविण्यात यावा, अशा सूचना सभागृहाने डॉ खलीपे यांना दिल्या. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती डॉ अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलीपे, सदस्य प्रिंतेश राऊळ, लॉरेन्स मान्येकर, राजेश कविटकर, हरी खोबरेकर, नूतन आईर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कोरोना काळात केलेल्या खर्चाला मान्यता देण्याचा विषय आल्यावर सभापती डॉ दळवी यांनी याला आम्ही मान्यता देणार नसल्याचे सांगितले. यावर सदस्य हरी खोबरेकर यांनी मान्यता देणार नाही तर अजेंठ्यावर विषय का ठेवला ? असा प्रश्न केला. यावर सौ दळवी यांनी माझी अजेंठ्यावर स्वाक्षरीच नाही. मला विचारलेच नाही, असा आरोप केला. मात्र, त्यावर डॉ खलीपे उत्तर देऊ शकले नाहीत. विषय पत्रिकेवर तुमची स्वाक्षरी आहे, असे सांगून वेळ मारून नेली. यावेळी मागील सभेत सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. तसेच इतिवृत्तात मांडलेले विषय चुकीचे लिहिले गेले. त्यामुळे सदस्य मान्येकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खलीपे यांना चांगलेच धारेवर धरले. सभेची पूर्तता होत नसेल तर तुमचे काय काम ? आम्ही सभेला का यावे ? असे प्रश्न केले. यावेळी बदल करून घेण्याचा सूचना करण्यात आल्या. यावेळी कोरोना लस नियोजनावरून जोरदार चर्चा झाली. हरी खोबरेकर यांनी ६०० लोकसंख्या असलेल्या गावाला व २ हजार लोकसंख्या असलेल्या गावाला सारखीच लस वाटण्यात आल्याने मोठी लोकसंख्या असलेल्या गावावर अन्याय झाल्याचा आरोप केला. यावेळी पूर्ण सभागृहाने लोकसंख्येनुसार लसीचे नियोजन करण्याची मागणी केली.

You cannot copy content of this page