भाजप शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांची मागणी
*⚡बांदा ता.२३-:* मडुरा व सातोसे गावात वीजवाहिन्यांवर ठिकठिकाणी झुडपे वाढल्याने वीज खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत बांदा येथील अभियंत्यांचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मडुरा – सातोसे भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी सावंतवाडी उपविभागीय सहाय्यक अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसात वीज वाहिन्यांवरील झुडपांची सफाई न केल्यास सावंतवाडी कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मडुरा, सातोसे गावातील वीज वाहिन्या जंगल भागातून गेल्या आहेत. वाहिन्यांवरील झुडपांची सफाई महावितरणकडून करण्यात न आल्याने वीज खंडीत होण्याचे प्रकार वारंवार होत असतात. याबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. बांदा वीज कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी अभियंता हजर नसतात. थातूरमातूर उत्तरे वीज कर्मचार्यांकडून दिली जातात अशा तक्रारी यशवंत माधव यांनी अभियंता घुगे यांच्याकडे केल्या. कोकणातील महत्वपूर्ण गणेशचतुर्थी सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेत महावितरणकडून सफाईची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी यशवंत माधव यांनी केली. याबाबत अभियंता घुगे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या चार दिवसात वाहिन्यांवरील झुडपे सफाईची कामे सुरु करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास सावंतवाडी कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा माधव यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला.
